पुणे : फिलिरपाईन्सने नियोजित वेळेतील १-१ गोल बरोबरीनंतर पेनल्टी शूटआऊट मध्ये चायनीज तैपेईचा ४-३ गोलने पराभव करून एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करीत एतिहासिक कामगिरी केली आहे .
तर म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलातील मैदानावर झालेल्या सामन्यात दक्षिणपूर्व आशियातील फिलिपाईन्ससाठी हा विजय ऐतिहासिक ठरला. त्यांनी प्रथमच एएफसी वुमन्स आशिया कप स्पधेर्ची उपांत्य फेरी गाठली नाही, तर त्यांनी महिलांच्या विश्वकरंडक स्पर्धेसाठी देखिल पात्रता सिद्ध केली. आता उपांत्य फेरीत गुरुवारी त्यांची गाठ कोरियाशी पडणार आहे.
याच मैदानावर आधी झालेल्या सामन्यात कोरियाने ऑस्ट्रेलियाला धक्का दिला. ऑस्ट्रेलियाच्या पराभवामुळे आता चायनीज तैपेईचा विश्वकरंडक स्पधेर्तील समावेश आता तीन संघांच्या प्ले ऑफ लढतीमधून होईल. यामधील अव्वल संघ राऊंड रॉबिन फेरीत खेळतील. उर्वरित दोन संघ आंतरखंडीय प्ले ऑफ लढतीत खेळतील.
चायनीज तैपेई आणि फिलिपाईन् संघ अनुक्रमे ए आणि बी गटात उपविजेते ठरले होते. आजच्या सामन्यातच दोन्ही संघांनी संथ सुरवात केली. सुरवातीच्या मिनिटातला खेळ हा मैदानाच्या मध्यभागीच अधिक झाला. सामन्याच्या नवव्या मिनिटाला गोल करण्याची पहिली संधी फिलिपाईन्सला लमिळाली. सरिना बोल्डन हिने जोरदार मुसंडी मारली. मात्र, तिचा पास घेऊन गोल करण्यात त्यांच्या आक्रमकांना अपयश आले ,चायनीज तैपेई संघाचा भक्कम बचाव त्यांना भेदता आला नाही.
दुसरीकडे चायनीज तैपेई संघाने पासिंगच्या सुरेख खेळाचे प्रदर्शन केले. सामन्याच्या १९व्या मिनिटाला सू यु सुआन हिने फिलिपाईन्सच्या बचावफळीची कसोटी पाहिली. त्यानंतर २३व्या मिनिटाला चेन येन पिंग हिचाही प्रयत्न फिलिपाईन्सची गोलरक्षक मॅकडॅनिएल हिने परतवून लावला. तैपेईची आक्रमणे होत असतानाच फिलिपाईन्सनेही प्रतिआक्रमण करण्याची संधी सोडली नाही. पूर्वार्धात ३७व्या मिनिटासला बोल्डन हिचा क्रॉस पास क्वेझेडाने घेतला खरा, पण तिची किक बाहेर गेली.
उत्तरार्धात फिलिपाईन्सने कमालीचा वेगवान खेळ करताना तैपेई संघावर दडपण ठेवले आणि त्यांचा बचाव भेदण्यात यश मिळविले. सामन्याच्या ४८व्या मिनिटाला क्वेझाडा हिने कटरिना गुलौऊ हिच्याकडून आलेल्या हेडिंग पासवर तैपेईची गोलरक्षक सु यु हिला अगदी जवळून चकवले. एका गोलने पिछाडीवर पडलेल्या तैपेई संघानेही नंतर आपली आक्रमणाची धार अधिक धारदार केली. दोन्ही संघांच्या या आक्रमक भूमिकेमुळे उत्तराधार्तील अखेरचा टप्पा चांगलाच वेगवान झाला. तैपेईची कर्णधार वँगह सिआंग हुई हिने टिंग चीच्या पासवर गोल करण्याचा जबरदस्त प्रयत्न केला. पण, चेंडूगोलपोस्टच्या अगदी जवळून बाहेर गेला. त्यांच्या प्रयत्नांना अखेर ८२व्या मिनिटाला यश आले. झुओ ली पिंग हिने २५ यार्डावरून मारलेल्या किकने जाळीचा अचूक वेध घेतला आणि सामना बरोबरीत आणून अतिरिक्त वेळेत नेला.
अतिरिक्त वेळेतही बरोबरीची कोंडी फुटू शकली नाही. तैपेईची राखीव खेळाडू लिन सिन हुई हिचा ११२व्या मिनिटाला गोल करण्याचा प्रयत्न थोडक्यात हुकला. अतिरिक्त वेळही बरोबरीत राहिल्याने अखेरीस पेनल्टी शूट आऊटमध्ये फिलिपाईन्सने ४-३ गोलने बाजी मारून उपांत्य फेरीत प्रवेशाबरोबर महिला विश्वकरंडक स्पर्धेतील प्रवेशावर शिक्कामोर्तब केले.