क्रिकेटरसिकांना आता भारतातील आयपीएल २०२२च्या मेगा ऑक्शनचे वेध लागले आहे. जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग असणारी ही स्पर्धा यंदा कुठे होणार, असा प्रश्नही अनेकांना पडला आहे. आयपीएल २०२२ मधील लीग टप्पा महाराष्ट्रात आयोजित केला जाऊ शकतो. त्याचवेळी अहमदाबादमध्ये प्लेऑफचे सामने होऊ शकतात. यावेळी आयपीएलमध्ये १० संघ सहभागी होत असून ७४ सामने खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत बीसीसीआयला तीन स्टेडियम उपलब्ध असलेल्या महाराष्ट्राची राजधानी मुंबईवर लक्ष केंद्रित करायचे आहे.
साखळी टप्प्यातील सामने मुंबईतील वानखेडे, ब्रेबॉर्न आणि डीवाय पाटील स्टेडियमवर खेळवले जातील. गरज भासल्यास पुण्यात आयपीएलचे सामने आयोजित केले जातील. सध्या मंडळ महाराष्ट्रात लीग स्टेज आणि अहमदाबादमध्ये प्लेऑफ आयोजित करण्याचा विचार करत आहे. अहवालात असेही म्हटले आहे, की बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी (२७ जानेवारी) भेट घेतली आणि देशातील कोविडची परिस्थिती बिघडली नाही, तर ही स्पर्धा भारतात आयोजित केली जाईल असे स्पष्ट केले. परिस्थिती बिघडल्यास ते यूएईला जातील.
अहवालात असेही म्हटले आहे, की कोविड परिस्थिती नियंत्रणात राहिली तर स्टेडियममध्ये किमान २५ टक्के क्षमतेच्या प्रेक्षकसंख्येला परवानगी देण्याची योजना आहे. यासाठी राज्य सरकारची परवानगी घेण्याची तयारी बीसीसीआयने केली आहे.
१२ आणि १३ फेब्रुवारीला आयपीएलचा मेगा लिलाव बंगळुरू येथे होणार आहे. यावेळी १२००हून अधिक खेळाडूंनी लिलावासाठी नोंदणी केली आहे. यामध्ये ८९६ भारतीय आणि ३१८ परदेशी खेळाडूंचा समावेश आहे.