गेल्या वर्षी पायाच्या दुखापतीमुळे सहा महिने टेनिस कोर्टापासून दूर राहावे लागल्याने स्पेनचा तारांकित खेळाडू राफेल नदालच्या मनात निवृत्तीचा विचार आला होता. मात्र, लढवय्या नदालला अशा पद्धतीने टेनिसला अलविदा करणे मान्य नव्हते. त्याने मेहनत घेत केवळ टेनिस कोर्टावर पुनरागमन केले नाही, तर वर्षातील पहिली ग्रँडस्लॅम स्पर्धा अशी ख्याती असलेल्या ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेचे जेतेपदही पटकावले. रविवारी झालेल्या पुरुष एकेरीच्या अंतिम सामन्यात नदालने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा पाच सेटमध्ये पराभव करत विक्रमी २१व्या ग्रँडस्लॅम जेतेपदावर कब्जा केला.
विक्रमादित्य’ नदालने तब्बल पाच तास आणि २५ मिनिटे रंगलेल्या अंतिम सामन्यात दोन सेटच्या पिछाडीनंतरही २-६, ६-७ (५), ६-४, ६-४, ७-५ अशी बाजी मारली. त्यामुळे त्याने पुरुष टेनिसपटूंमधील सर्वाधिक २१ ग्रँडस्लॅम जेतेपदांचा विक्रम आपल्या नावे करताना रॉजर फेडरर आणि नोव्हाक जोकोव्हिच (प्रत्येकी २० जेतेपदे) यांना मागे टाकले. तसेच ऑस्ट्रेलियन खुली स्पर्धा जिंकण्याची ही २००९ नंतर दुसरी वेळ ठरली.
नदालने मात्र जिद्दीने पुनरागमन केले. त्याने तिसऱ्या आणि चौथ्या सेटमध्ये मेदवेदेवची सर्व्हिस एकदा मोडताना दोन्ही सेटमध्ये प्रत्येकी ६-४ अशा फरकाने सरशी साधली. पाचव्या सेटमध्ये नदाल आणि मेदवेदेव या दोघांनीही झुंजार खेळ केला. या सेटमध्ये २-२ अशी बरोबरी असताना नदालने मेदवेदेवची सर्व्हिस मोडत आणि मग आपली सर्व्हिस राखताना ४-२ अशी आघाडी मिळवली. परंतु मेदवेदेवने पुनरागमन करताना ५-५ अशी बरोबरी साधली. मात्र, नदालने पुन्हा मेदवेदेवची सर्व्हिस मोडली आणि स्वत:ची सर्व्हिस राखत या सेटमध्ये ७-५ असा विजय मिळवला.
सर्वाधिक ग्रँडस्लॅम जेतेपदांचे मानकरी –
राफेल नदाल : २१
रॉजर फेडरर : २०
नोव्हाक जोकोव्हिच : २०
पीट सॅम्प्रस : १४
नदालची ग्रँडस्लॅम जेतेपदे-
ऑस्ट्रेलियन : २००९, २०२२
फ्रेंच : २००५, २००६, २००७, २००८, २०१०, २०११, २०१२, २०१३, २०१४, २०१७, २०१८, २०१९, २०२०
विम्बल्डन : २००८, २०१०
अमेरिकन : २०१०, २०१३, २०१७, २०१९
दीड महिन्यांपूर्वी मी पुन्हा टेनिस खेळू शकेन याबाबत साशंका होतो. मात्र, आज माझ्या हातात ऑस्ट्रेलियन स्पर्धेचा चषक आहे. मी या क्षणासाठी किती मेहनत घेतली याची कोणाला कल्पनाही नाही. हा माझ्या कारकिर्दीतील सर्वात भावनिक क्षणांपैकी एक आहे. या स्पर्धेदरम्यान मला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा लाभला. त्यांचा मी आभारी आहे. – राफेल नदाल