भारत-वेस्ट इंडिज संघ ६ फेब्रुवारीपासून एकदिवसीय मालिका खेळणार आहेत. या मालिकेत संघाची कमान रोहित शर्माच्या हाती आहे. रोहितलाही एका मोठ्या पराक्रमाची सुवर्णसंधी मिळणार आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध वनडेमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत रोहित दिग्गज फलंदाज सचिन तेंडुलकरला मागे टाकू शकतो.
वेस्ट इंडिजविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा फलंदाज विराट कोहली आहे. कोहलीने आतापर्यंत ३८ डावात २२३५ धावा केल्या आहेत. कोहलीने या संघाविरुद्ध ९ शतके झळकावली आहेत. कोहली कोणत्याही संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावणारा फलंदाज आहे. सचिन तेंडुलकरने वेस्ट इंडिजविरुद्ध ३९ डावात १५७३ धावा केल्या आहेत.
रोहित शर्माने २००९ पासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३३ सामन्यांत १५२३ धावा केल्या आहेत. रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध १६२ धावांची इनिंग खेळली होती. त्याने विंडीजविरुद्ध ३ शतके आणि ११ अर्धशतके झळकावली आहेत. अशा परिस्थितीत रोहितने या मालिकेत ५१ धावा केल्या, तर तो सचिन तेंडुलकरला मागे टाकेल.