भारताचा कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनी आता क्रिकेटच्या मैदानावर क्वचितच दिसत असला तरी, आजही कोणत्या ना कोणत्या कारणाने चाहत्यांना त्याची आठवण येते. धोनी सध्या पाकिस्तान सुपर लीगमुळे (PSL 2022) चर्चेत आहे. पीएसएलच्या एका सामन्यात फलंदाजाने हुबेहुब धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट खेळला आणि सर्वांनाच धोनी आठवला.
धोनीचा हेलिकॉप्टर शॉट खेळणारा फलंदाज अफगाणिस्तानचा रहमानउल्ला गुरबाज आहे. पीएसएलच्या या हंगामात इस्लामाबाद युनायटेडकडून गुरबाज खेळत आहे. पेशावर जल्मीविरुद्धच्या सामन्यात गुरबाजने हा फटका खेळत धोनीची आठवण करून दिली. यापूर्वी राशिद खान आणि हार्दिक पंड्या यांसारख्या खेळाडूंनी हेलिकॉप्टर शॉटही अनेक प्रसंगी खेळला आहे. आता गुरबाजही या यादीत सामील झाला आहे. त्याने खेळलेल्या हेलिकॉप्टर शॉटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
whats up with afghanistan and the helicopter pic.twitter.com/kdyLmXAd1P
— Jazib (@JazibChaudry) January 30, 2022
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना पेशावर जल्मीने २० षटकांत ६ बाद १६८ धावा केल्या. पेशावरकडून शेरफेन रूदरफोर्डने ४६ चेंडूत ७० धावा केल्या. या खेळीत रूदरफोर्डने ७ चौकार आणि ३ षटकार मारले. या लक्ष्याचा पाठलाग करताना इस्लामाबाद युनायटेड संघाने वेगवान सुरुवात केली. अॅलेक्स हेल्स आणि पॉल स्टर्लिंग यांनी ९.४ षटकात ११२ धावा केल्या. स्टर्लिंग ५७ धावांची खेळी खेळून बाद झाला. तिसऱ्या क्रमांकावर आलेल्या रहमानउल्ला गुरबाजने २७ धावा ठोकल्या. संघाला विजय मिळवून देण्यासाठी त्याची खेळीच कामी आली.