बडोदा – राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राची अव्वल बॅडमिंटनपटू मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठली आहे. सुवर्ण पदकासाठी गुरुवारी मालविकाचा सामना आकर्शी कश्यपशी होणार आहे.बॅडमिंटन स्पर्धेत मालविका बनसोड हिने अंतिम फेरी गाठून महाराष्ट्राचे एक पदक निश्चित केले आहे. मालविका आणि आकर्शी यांच्यात अनेक लढती झालेल्या असून दोन्ही खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. त्यामुळे अंतिम सामना चुरशीचा होणार आहे.
उपांत्य सामन्यात मालविका बनसोड हिने अदिती भट हिचा 21-10, 19-21, 21-13 अशा फरकाने पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला. डावखुऱ्या मालविका बनसोड हिने अदिती भट विरुद्ध पहिला गेम 21-10 असा सहज जिंकून सामन्यात आघाडी घेतली. मालविकाने पहिला गेम झटपट जिंकला. मात्र दुसऱ्या गेममध्ये अदिती भट हिने जोरदार प्रत्युत्तर देत दुसरा गेम 21-19 असा जिंकून सामन्यात रंगत आणली.
उभय खेळाडूंनी 1-1 गेम जिंकला असल्याने निर्णायक तिसऱ्या गेमच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष होते. मालविका बनसोड हिने तिसरा गेम 21-13 असा जिंकून अदिती भटचे आव्हान संपुष्टात आणले. उपांत्य सामन्यात मालविका बनसोडला विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागला. खास करून दुसऱ्या गेममध्ये अदितीने जोरदार प्रत्युत्तर दिले. या लढतीत मालविका हिने उत्कृष्ट रॅलीचा खेळ केला. बॅकहॅन्ड, फोरहॅंड फटक्यांनी मालविकाने अदितीवर दबाव बनवला आणि सामना जिंकून मालविका हिने बॅडमिंटन स्पर्धेत महाराष्ट्राच्या सुवर्ण पदकाच्या आशा पल्लवित केल्या आहेत.
बॅडमिंटन प्रशिक्षक अक्षय देवलकर यांनी सांगितले की उपांत्य फेरीत मालविका सहज जिंकण्याची खात्री होती. विजय थोडं लांबला एवढंच. अंतिम सामन्यात दोन्ही खेळाडू तुल्यबळ प्रतिस्पर्धी आहेत. सुवर्ण पदकासाठी दोघांमधील अंतिम लढत रंगतदार ठरेल.
गोल्ड हेच टार्गेट : मालविका बनसोड
अंतिम फेरी गाठल्यावर मालविका बनसोड म्हणाली की, उपांत्य सामना जिंकण्यासाठी तीन गेम खेळावे लागले. दुसऱ्या गेममध्ये काही चुका झाल्याने सामना तिसऱ्या गेम पर्यंत गेला. अंतिम सामन्यात माझा सामना आकर्शी कश्यपशी होणार आहे. आम्ही दोघांनी अनेक फायनल्स खेळलो आहोत. हा अंतिम सामना प्रेक्षणीय ठरणार. अर्थात सुवर्ण पदक जिंकणे हेच मुख्य टार्गेट आहे अशी प्रतिक्रिया मालविका बनसोड हिने व्यक्त केली आहे.