अहमदाबाद- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या स्केटिंगपटूंनी पदकांची लयलूट केली आहे. शनिवारी झालेल्या स्केट बोर्ड इव्हेंटमध्ये महाराष्ट्र संघाने दोन सुवर्ण, दोन रौप्य व एक कांस्य अशी पाच पदकांची कमाई केली आहे. आत्तापर्यंत स्केटिंग संघाने महाराष्ट्रास आठ पदके जिंकून दिली आहेत.
स्केट बोर्ड स्पर्धेचा दुसरा दिवस महाराष्ट्राच्या श्रद्धा गायकवाड हिने सुवर्णपदक जिंकून गाजवला. उर्मिला पाबळे हिने रौप्यपदक पटकावले. शुभम सुराणा याने रौप्यपदक जिंकले. निखिल शेलाटकर याने कांस्य पदक संपादन केले. आर्टिस्टिक कपल डान्स प्रकारात महाराष्ट्राच्या यशस्वी शाह व इलुरी कृ्ष्णा साई राहुल या जोडीने सुवर्णपदक जिंकून आणखी धमाल उडवून दिली.
स्केटिंग संघास प्रशिक्षक श्रीपाद शिंदे, आशुतोष जगताप, संघटनेचे राज्य अध्यक्ष पी के. सिंग व संघ व्यवस्थापक डॉ. महेश कदम यांनी खेळाडूंनी अपेक्षेप्रमाणे कामगिरी केल्याचा आनंद व्यक्त केला.
थोडक्यात सुवर्ण हुकले ः शुभम सुराणा
रौप्यपदक जिंकल्याचा आनंद निश्चितच आहे. परंतु, सुवर्णपदक थोडक्यात हुकल्याची खंत जरुर आहे अशा शब्दांत रुपेरी यश संपादन करणा-या शुभम सुराणा याने व्यक्त केली. शुभम म्हणाला की, सरावात प्रचंड मेहनत घेतली होती. अपेक्षानुसार कामगिरी झाली. परंतु, शुज समस्येमुळे थोड्या फरकाने सुवर्णपदक हुकले याची खंत वाटते. यावेळी जरी सुवर्ण हुकले असले तरी आगामी काळात भारतात होणा-या स्पर्धेत सुवर्णपदक नक्की जिंकू असा विश्वास शुभमने व्यक्त केला आहे.
कांस्य पदकावर समाधानी नाही निखिल शेलाटकर
कांस्य पदक जिंकले याचा आनंद होत असला तरी मी कांस्य पदकावर समाधानी नाही. सरावात ज्या प्रकारे तयारी केली होती त्यानुसार सुवर्णपदक नक्की जिंकण्यात यश आले असते. परंतु, सरावाच्यावेळी पायाला दुखापत झाली. तसेच शुजची समस्या तीव्रतेने जाणवत होती. दुखापतीमुळे स्पर्धेत मी सावधतेने स्केट करत होतो. रौप्यपदक तरी मिळायला हवे होते. गोल्ड तर हुकले आहेच. याची कसर आगामी स्पर्धेत नक्कीच भरुन काढू असा विश्वास निखिल शेलाटकर याने व्यक्त केला.
मुलांची कामगिरी आनंददायी ः श्रीपाद शिंदे
या स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांनी पदके जिंकून अपेक्षेनुसार कामगिरी केल्याचा आनंद आहे. निखिल हा एका चाळीत राहतो. त्याचे वडील एक छोटेसे किराणा दुकान चालवतात. महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेची मदत लाभल्याने हे खेळाडू इथपर्यंत पोहचले आणि त्यांनी पदक विजेती कामगिरी केली. याबद्दल एमओएचे आभार मानायला हवे.शासनाने मदत केली म्हणून हे खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत आपले कौशल्य दाखवू शकले. कठीण परिस्थितीत खेळाडूंनी पदक जिंकून आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवला याचा मोठा आनंद आहे, असे संघाचे प्रशिक्षक श्रीपाद शिंदे यांनी सांगितले.