गांधीनगर- राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत स्क्वॉश स्पर्धेला शनिवारी प्रारंभ झाला. महाराष्ट्राच्या उर्वशी जोशी, अंजली सेमवाल, ओम सेमवाल आणि राहुल बैठा यांनी विजयी सलामी देत दुसरी फेरी गाठली आहे.महाराष्ट्र स्क्वॉश संघाकडून पदकांची अपेक्षा बाळगली जात आहे. त्यानुसार पहिल्या फेरीत महाराष्ट्राच्या चार खेळाडूंनी विजयी सलामी देत आगेकूच केली आहे.
महिला गटात उर्वशी जोशी हिने चंदीगडच्या निधी देवनांगचा 3-0 असा सहज पराभव करुन दुसरी फेरी गाठली. अंजली सेमवाल हिने बिहारच्या सोनी कुमारीवर 3-0 असा सहज विजय साकारला.पुरुष गटात ओम सेमवाल याने झारखंडच्या शिवेश कनोईचा 3-0 ने सहज पराभव केला. राहुल बैठा याने आसामच्या सुजल पाठकला 3-0 ने हरवले. सुरज चंदला पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली आहे.
महाराष्ट्र स्क्वॉश संघास प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव, प्रियांका मंत्री यांचे मार्गदर्शन लाभत आहे. अपेक्षेप्रमाणे खेळाडूंनी विजयी सुरवात केली आहे. खेळाडू आपली लय कायम ठेवत फायनलपर्यंत मजल मारतील असा विश्वास प्रशिक्षक यज्ञेश्वर बागराव यांनी व्यक्त केली. तसेच महाराष्ट्र स्क्वॉश संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे यांनी पहिल्या फेरीतील खेळाडूंच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले.