गांधीनगर- छत्रपती शिवाजी महाराज की जय असा जयघोष करुन महाराष्ट्राच्या तलवारबाजी खेळाडूंनी एकूण पाच पदके जिंकून राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत ऐतिहासिक यश संपादन केले. 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत तलवारबाजी खेळात सेबर सांघिक प्रकारात महाराष्ट्राच्या पुरुष संघाने कांस्य पदक जिंकले. सेबर सांघिक मुलांमध्ये महाराष्ट्राचा सामना उपांत्यपूर्व लढतीत बलाढ्य जम्मू काश्मीर संघासोबत झाला.
अत्यंत अटीतटीच्या लढतीत महाराष्ट्राने (45- 43) अवघ्या तीन गुणांनी मात करुन उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत महाराष्ट्राची लढत पंजाब संघासोबत झाली. पंजाब संघााने 45-33 अशा मोठ्या फरकाने महाराष्ट्र संघाचा पराभव करुन अंतिम फेरी गाठली.
उपांत्य फेरीतील पराभवामुळे महाराष्ट्र संघास कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. कांस्य पदक विजेत्या संघात अभय शिंदे, धनंजय जाधव, श्रीशैल शिंदे व ऋत्विक शिंदे या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंनी दोन्ही महत्वाच्या सामन्यांत अप्रतिम कामगिरी केली.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र संघाने एकूण पाच पदके जिंकली आहेत. त्यात एक रौप्य व चार कांस्य पदकांचा समावेश आहे. एकूणच महाराष्ट्राच्या तलवारबाजी खेळाडूंनी पाच पदके जिंकून एक नवा इतिहास निर्माण केला आहे. या कामगिरीबद्दल बोलताना महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे कार्यकारिणी सदस्य व महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सरचिटणीस डॉ. उदय डोंगरे यांनी महाराष्ट्राच्या कामगिरीविषयी आनंद व्यक्त केला.
खेळाडूंनी पाच पदकांची कमाई करुन ऐतिहासिक यश संपादन केले आहे. तीन्ही संघांनी पदके जिंकली आहेत हे विशेष. शिवाय दोन पदके वैयक्तिक गटात देखील मिळाली आहेत. गेल्या 10-20 वर्षांपासून महाराष्ट्राचे खेळाडू अथक मेहनत घेत आहेत. त्याचे हे फळ आहे. सेनादल, पंजाब, हरियाणा या राज्यांच्या तुलनेत आपल्या खेळाडूंना मिळणा-या सुविधा पाहता त्यांचे हे यश निश्चितच कौतुकास्पद आहे, असे डॉ. डोंगरे यांनी सांगितले.
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सरचिटणीस नामदेव शिरगावकर यांनी तलवारबाजी संघाने मिळवलेल्या यशाबद्दल आनंद व्यक्त करुन संघातील सर्व खेळाडू, प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे. महाराष्ट्राच्या तलवारबाजी संघासमवेत प्रशिक्षक म्हणून स्वप्नील तांगडे, संजय भुमकर, भूषण जाधव, शोएब मोहंमद वकील, संघ व्यवस्थापक राजकुमार सोमवंशी, नयना नायर यांनी काम पाहिले.