अहमदाबाद – कर्णधार शंकरच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र पुरुष कबड्डी संघाने मंगळवारी ३६ व्या नॅशनल गेम्समध्ये सलग दुसरा विजय साजरा केला. फाॅर्मात असलेल्या महाराष्ट्र संघाने दुसऱ्या सामन्यात चंदीगडला धुळ चारली. महाराष्ट्र टीमने ६०-२१ ने दणदणीत विजयाची नाेंद केली. संघाच्या विजयासाठी आकाश, असलम, पंकज माेहिते, मयुर कदम यांची कामगिरी महत्त्वपूर्ण ठरली. त्यामुळे महाराष्ट्र संघाला आपली विजयी माेहिम कायम ठेवता आली.
आता महाराष्ट्राचा गटातील तिसरा आणि शेवटचा सामना बुधवारी सर्व्हिसेस टीमविरुद्ध हाेणार आहे. यातील विजयाने महाराष्ट्राला बाद फेरीचा प्रवेश निश्चित करता येणार आहे. पहिल्याच सामन्यातील विजयाने आमविश्वास बुलंदीवर असलेल्या महाराष्ट्र संघाला दुसऱ्या लढतीत चंदीगडविरुद्ध शेवटपर्यंत आपला दबदबा कायम ठेवता आला.
यातून चंदीगडला माेठ्या फरकाने पराभवाला सामाेरे जावे लागले. यादरम्यान महाराष्ट्राकडून आकाश, अक्षय, मयूर यांची खेळी काैतुकास्पद ठरली. यातून महाराष्ट्राने दमदार सुरुवात करताना पहिल्याच हाफमध्ये माेठी आघाडी मिळवली. त्यानंतर हिच लय कायम ठेवताना सामना आपल्या नावे केला.