महाराष्ट्राच्या कोमल जगदाळे हिने तीन हजार मीटर्स स्टीपलचे शर्यतीत रौप्य पदक जिंकले. तिने ही शर्यत १० मिनिटे ०.२२ सेकंदात पार केली. या शर्यतीत तिच्यापुढे आंतरराष्ट्रीय धावपटू पारुल चौधरी हिचे आव्हान होते. कोमल ही नाशिक येथे ज्येष्ठ आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक विजेंदर सिंग यांच्या अकादमीत सराव करते. चौधरी हिने हे अंतर नऊ मिनिटे ५६.६५ सेकंदात पूर्ण केले आणि सुवर्ण पदक मिळविले.
पुरुषांच्या आठशे मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या प्रकाश गदादे याला चौथ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले. महिलांच्या आठशे मीटर्स शर्यतीत महाराष्ट्राच्या यमुना लडकत हिला पाचवे स्थान मिळाले तर दोनशे मीटर्स धावण्याच्या शर्यतीत ऐश्वर्या मिश्रा हिने चौथा क्रमांक पटकाविला. ऐश्वर्या हिने या स्पर्धेत याआधी चारशे मीटर्स अंतराची शर्यत जिंकली होती.
संजीवनी जाधव हिला पदक नाहीच!
महाराष्ट्राची आंतरराष्ट्रीय धावपटू संजीवनी जाधव हिने सोमवारी सकाळी झालेल्या दहा हजार मीटर्स धावण्याच्या शर्यतीत सुवर्णपदक जिंकले होते. त्यावेळी तिने हे अंतर ते ३० मिनिटे ४०.५१ सेकंदात पार केले होते. या शर्यतीत हिमाचल प्रदेशची सीमा कुमारी तर हरियाणाची भारती कुमारी यांनी अनुक्रमे रौप्य व ब्रॉंझपदक जिंकले होते. संजीवनी हिने सुवर्णपदक जिंकल्याचे जाहीरही करण्यात आले. तथापि हरियाणाच्या संघ व्यवस्थापनाने तिच्या पदकाबाबत आक्षेप नोंदविला आणि त्यानंतर तिला तांत्रिक कारणास्तव शर्यती मधून बाद करण्यात आले. मात्र महाराष्ट्र संघ व्यवस्थापनाने या निर्णयाबाबत अपील केले होते. हे अपील स्पर्धेच्या तांत्रिक समितीने मंगळवारी झालेल्या बैठकीत अमान्य केले. त्यामुळे या शर्यतीमधील पदकापासून संजीवनी वंचितच राहिली.