पुठ्ठे गोळा करुन कुटुंबाला मदत करणारा खो-खो मधील हिरा रामजी कश्यप

अहमदाबाद:घरची आर्थिक परिस्थिती बेताची. खेळण्यासाठी अनुकूल वातावरण असे नव्हतेच. पुठ्ठे गोळा करुन त्याची विक्री करणे हाच एकमेव आर्थिक स्त्रोत. त्यामुळे कुटुंबातील सर्वच जण पुठ्ठे गोळा करण्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेतात. अशा प्रतिकूल परिस्थितीत रामजी कश्यप हा खोखोतील एक हिरा राष्ट्रीय पातळीवर चमकू लागला आहे. रेल्वे संघाकडून खेळण्याची इच्छा बाळगून असलेल्या रामजी कश्यप याने आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे स्वप्न बाळगले आहे.

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र खोखो संघाच्या दिमाखदार कामगिरीत रामजी कश्यप याचा मोलाचा वाटा आहे. खरे तर रामजी कश्यप याची ही पहिलीच सिनियर राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा आहे. पदार्पणातच रामजी कश्यप याने आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील वेळापूर हे रामजी कश्यप याचे गाव. साधारणः दहा वर्षांपूर्वी रामजी कश्यप याने खोखो खेळ खेळण्यास सुरवात केली. शाळेत शिकत असताना जाधव एन. एस. सरांनी रामजी कश्यपमधील खोखो खेळण्याचे कौशल्य ओळखले आणि त्याला एक दिशा दिली. त्यामुळे रामजी कश्यप आज खोखोचे मैदान गाजवू लागलेला आहे.

महाराष्ट्राचे सहा वेळेस वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये प्रतिनिधित्व करणा-या रामजी कश्यपची ही पहिलीच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा. या स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या कामगिरीत रामजी कश्यपने प्रत्येक सामना मोलाचा वाटा उचलला आहे.रामजी कश्यप याची खोखो खेळातील वाटचाल अतिशय प्रतिकूल वातावरणातून झाली आहे. रामजी कश्यप याच्या कुटुंबाची आर्थिक स्थिती बेताचीच आहे. घरात नऊ सदस्य आहेत. पुठ्ठे गोळा करुन त्याच्या विक्रीवर घर खर्च चालवणे हाच त्यांचा मुख्य आर्थिक स्त्रोत आहे. पुठ्ठे गोळा करण्याचे काम रामजी कश्यप याने देखील अनेक वर्षे केले आहे.

घरची आर्थिक स्थिती बेताची असल्याने खेळाविषयी घरात फारसी कोणाला आवड अशी नव्हती. रामजीला मोठा भाऊ नारायण व बहिण अंजली यांनी खेळण्यासाठी प्रोत्साहन दिले. लहान भाऊ अजय हा देखील खोखो खेळतो.रामजी कश्यप हा देखील पुठ्ठे गोळा करण्यासाठी कुटुंबाला मदत करतो. त्याचा दिवस सकाळी पाच वाजेपासून सुरू होतो. सकाळी पाच वाजता उठायचे. त्यानंतर आठ वाजेपर्यंत खोखो खेळाचा सराव. त्यानंतर पुठ्ठे गोळा करावयाचे. त्यानंतर पुन्हा संध्याकाळी खोखोचा सराव. असा दिनक्रम रामजीचा आहे.
राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत प्रथमच खेळत असताना रामजी कश्यप याने सिनियर खेळाडूंसोबत खेळताना आपला ठसा उटमवला आहे. या स्पर्धेच्या अनुभवाविषयी सांगताना रामजी कश्यप म्हणाला, मी प्रथमच राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत खेळत आहे.

संघातील सर्वच सिनियर खेळाडूंनी मला प्रोत्साहन दिले आहे. मोठ्या स्पर्धेत खेळण्याचा दबाव हा असतोच. परंतु, मैदानावर उतरल्यावर काही क्षणातच मी दबाव विसरुन गेलो आणि माझा नैसर्गिक खेळ केला. त्याचा संघाला फायदा झाला याचा मला विशेष आनंद आहे. ही स्पर्धा माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव देणारी ठरली आहे. कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी रेल्वे संघाकडून खेळण्याची इच्छा आहे. तसेच आगामी काळात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचे प्रतिनिधित्व करण्याचे माझे स्वप्न आहे, असे रामजी कश्यप याने सांगितले.

You might also like

Comments are closed.