पंचकुला (प्रतिनिधी): बॅटमिंटनमध्ये महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवून सुवर्ण पदकास गवसणी घातली. पहिला गेम त्याने २१ विरूद्ध १५ असा तर दुसरा गेम २२ विरूद्ध २० या फरकाने जिंकला. दर्शनमुळे महाराष्ट्राच्या तालिकेत सुवर्ण पदकांच्या संख्येत भर पडली आहे.
ताऊ देवीलाल स्पोर्टस कॉम्प्लेक्समध्ये बॅडमिंटनचा अंतिम सामना रंगला. दर्शनच्या आक्रमक फटक्याचा ऋत्विकने तितक्याच लीलया प्रतिकार केला. पहिला गेम हरल्यानंतर त्याने दुसऱ्या गेममध्ये आघाडी घेतली होती. परंतु दर्शनने त्याचा प्रतिकार भेदत सुवर्ण पदक पटकावले.
पहिल्या गेममध्ये सुरूवातीला दर्शनने दोन गुण घेऊन आघाडी घेत खाते उघडले. ऋत्विकने तीन-तीन गुण बरोबरी झाली. मग मात्र, दर्शनने अकरा गुणांपर्यंत आघाडी घेतली. तेव्हा ऋत्त्विक होता ९ गुणांवर. पुढेही आघाडी कायम (१७ विरूद्ध १३) राहिली. हीच गती कायम ठेवत दर्शनने पहिला गेम २१ विरूद्ध १५ असा जिंकला.
दुसऱ्या गेममध्ये ऋत्विकने गुण घेऊन शुभारंभ केला. दर्शननेही सलग दोन घेतले. परंतु पुन्हा ऋत्विक आघाडीवर गेला. तो ४ गुणांनी आघाडीवर पोहचला. दर्शनने चांगले फटके मारून बरोबरी साधली. नेट पॉईंट घेण्याच्या नादात त्याने ऋत्विकला तीन पॉईंट दिले. हे कमी म्हणून की काय त्याने मारलेले काही फटकेही नेटमध्ये अडकले. परिणामी दर्शन ९ विरूद्ध १३ असा पिछाडीवर पडला. मात्र, सलग गुण घेत १३-१३ अशी बरोबरी केली.
दर्शनने सलग दोन घेतल्याने स्कोअर १५ झाला. ही आघाडी त्याने मॅच पॉईंटवर आणली. मागून ऋत्विकही २० गुणांवर आला. दर्शनने एक गुण घेतला. त्यानंतर ऋत्विकने मारला फटका फाऊल झाला. आणि दुसरा गेमही दर्शनने २२ विरूद्ध २० असा जिंकून सुवर्ण पदकास गवसणी घातली. दर्शन हा गोपीचंद यांच्या अकादमीत सराव करतो. यापूर्वी काही महिन्यांपूर्वी तो ऋत्विककडून हरला होता. खेलो इंडियात त्याला हरवून सुवर्ण जिंकले.
क्रीडामंत्र्यांच्या दर्शनला शुभेच्छा
हरियानाच्या मैदानावर महाराष्ट्राच्या दर्शन पुजारीने (मुंबई) बॅटमिंटनच्या अंतिम सामन्यात धडक मारल्यानंतर क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सकाळी व्हिडिओ कॉल करून सुवर्णपदकासाठी त्याला शुभेच्छा दिल्या. चांगला खेळून सुवर्णपदक घेऊन ये. आम्ही तुझी वाट पाहत आहोत. मनावर कोणतेही दडपण घेऊ नको, पदक तुझेच आहे. बिनधास्त खेळ, अशा शब्दांत क्रीडामंत्री केदार यांनी दर्शनचे मनोबल वाढवले. दर्शननेही अप्रतिम खेळ करीत पदक जिंकून क्रीडा विभाग व महाराष्ट्राची मान उंचावली. क्रीडा विभागासह मंत्र्यांचे त्याने आभार मानले. या विजयानंतर आपले लक्ष्य सुवर्णपदक असल्याची भावना त्याने व्यक्त केली.
सामन्यानंतर भगवा फेटा
सामन्यानंतर तीनही पदकविजेत्या खेळाडूंना भगवे फेटे बांधण्यात आले. या महाराष्ट्रीय आदरातिथ्याचे उपस्थितांनी कौतुक केले.