मुंबई | संजू सॅमसनच्या नेतृत्वात खेळणाऱ्या राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२२मध्ये सलग आपल्या दुसऱ्या विजयाची नोंद केली आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर रंगलेल्या सामन्यात राजस्थानने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सला २३ धावांनी धूळ चारली. सलामीवीर फलंदाज जोस बटलरची शतकी खेळी आणि त्याला इतर फलंदाजांनी दिलेली साथ या कामगिरीच्या जोरावर राजस्थानने मुंबईसमोर २० षटकात ८ धावा १९३ उभ्या केल्या.
मुंबईचा कप्तान रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी स्वीकारली. बटलरने मुंबईच्या गोलंदाजांची पिसे काढत ६८ चेंडूत १०० धावा ठोकल्या, तर शिमरोन हेटमायरने १४ चेंडूत ३५ धावा ठोकत त्याला उत्तम साथ दिली. प्रत्युत्तरात मुंबईकडून इशान किशन आमि तिलक वर्मा यांनी अर्धशतके ठोकली, पण मोक्याच्या क्षणी मुंबईचे फलंदाज ढेपाळले आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले.
राजस्थान रॉयल्सचा डाव
जोस बटलर आणि यशस्वी जयस्वाल यांनी राजस्थानच्या डावाची सुरुवात केली. जयस्वाल (१) या सामन्यात मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला. जसप्रीत बुमराहने त्याला टिम डेव्हिडकरवी झेलबाद केले. देवदत्त पडिक्कल (७) टायमल मिल्सचा बळी ठरला. त्यानंतर कप्तान संजू सॅमसनने १ चौकार आणि ३ षटकारांसह वादळी ३० धावा केल्या. कायरन पोलार्डने सॅमसनचा अडथळा दूर केल्यानंतर मैदानात आला शिमरोन हेटमायर. त्याने पोलार्डच्या एका षटकात २६ धावा लुटल्या. दरम्यान एका बाजूने फटकेबाजी करणाऱ्या बटलरने आपले दुसरे आयपीएल शतक फलकावर लावले. १९व्या षटकात बुमराहने हेटमायर आणि बटलरला माघारी धाडले. त्यामुळे राजस्थानला दोनशेपार जाता आले नाही. हेटमायरने १४ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांस ३५ तर बटलरने ११ चौकार आणि ५ षटकारांसह १०० धावा केल्या. राजस्थानने २० षटकात ८ बाद १९३ धावा केल्या. शेवटच्या २ षटकात राजस्थानने ५ फलंदाजांना गमावत फक्त ११ धावा काढल्या. बुमराहने १७ धावांत ३ तर टायमल मिल्सने ३५ धावांत ३ बळी टिपले.