न्यूझीलंडमध्ये खेळल्या जात असलेल्या महिला विश्वचषकाचा अंतिम सामना रविवारी ख्राइस्टचर्चमध्ये खेळवला जाणार आहे. यामध्ये ऑस्ट्रेलियाची इंग्लंडशी स्पर्धा होणार आहे. या सामन्यापूर्वी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ऑस्ट्रेलियन संघाला शुभेच्छा दिल्या. दोन्ही देशांमधील आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याच्या उद्देशाने ऑस्ट्रेलियासोबत ऐतिहासिक व्यापार करारावर स्वाक्षरी करताना पंतप्रधान मोदींनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
मोदी म्हणाले, “उद्या आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियन महिला संघाचे मी अभिनंदन करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो.” याआधीही मोदींनी महिला विश्वचषक स्पर्धेत ऑस्ट्रेलियन संघाच्या चांगल्या कामगिरीबद्दल पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांचे अभिनंदन केले होते. या स्पर्धेत भारतीय संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यास मुकला होता. विश्वचषकातील शेवटच्या साखळी सामन्यात भारताला विजय आवश्यक होता. मात्र त्यांना दक्षिण आफ्रिकेकडून पराभव स्वीकारावा लागला.
विश्वचषकात इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचा रेकॉर्ड खूप चांगला आहे. दोन्ही देशांनी आतापर्यंत मिळून दहा वेळा विश्वचषक जिंकला आहे. ३४ वर्षांनंतर हे दोन्ही संघ अंतिम फेरीत आमनेसामने असतील. यापूर्वी १९८८ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात विश्वचषकाचा अंतिम सामना झाला होता, जो ऑस्ट्रेलियाने जिंकला होता. ऑस्ट्रेलियाची नजर विक्रमी सातव्या विजेतेपदावर असेल. तर गतविजेता इंग्लंड जेतेपद वाचवण्यासाठी मैदानात उतरेल.