भारताच्या जीएस लक्ष्मी या उद्या रविवारी होणाऱ्या महिला वर्ल्डकप फायनलमध्ये सामनाधिकारी असतील. अशा प्रकारे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (ICC) सामनाधिकाऱ्यांच्या पॅनेलमध्ये स्थान मिळविणाऱ्या त्या पहिल्या महिला ठरल्या आहेत. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात वर्ल्डकपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे.
पुरुषांच्या आंतरराष्ट्रीय सामन्यातही सामनाधिकारी म्हणून सेवा बजावणाऱ्या लक्ष्मी या पहिल्या महिला आहेत. लक्ष्मी यांनी ही भूमिका डिसेंबर २०२० मध्ये यूएईमध्ये झालेल्या विश्वचषक लीग दोन दरम्यान बजावली होती. हेडिंग्ले ओव्हल येथे होणाऱ्या महिला विश्वचषक फायनलमध्ये क्रिकेटच्या इतिहासात प्रथमच चार महिला सामना अधिकारी भूमिका पार पाडतील. उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा पराभव केला तर इंग्लंडने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला.
India will have representation in the #CWC22 final!
Congrats GS Lakshmi! pic.twitter.com/gHPNVUe5tG
— ZeroLend (@WomensCricZone) April 1, 2022
२३ मे १९६८ रोजी राजमुंद्री, आंध्र प्रदेश येथे जन्मलेल्या लक्ष्मी यांचे वडील टाटा मोटर्समध्ये काम करत होते, त्यामुळे त्या जमशेदपूरमध्ये वाढल्या. इथेच त्यांनी क्रिकेट खेळायलाही सुरुवात केली. दक्षिण मध्य रेल्वेत नोकरी मिळाल्यानंतर त्या १९८९मध्ये हैदराबादला आल्या. त्या दक्षिण मध्य रेल्वे संघाकडूनही क्रिकेट खेळल्या. प्रदीर्घ संघर्षानंतर १९९९ मध्ये इंग्लंड दौऱ्यावर त्यांची भारतीय संघात निवड झाली, पण त्यांना एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. लक्ष्मी यांनी २००४ मध्ये क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.