मुंबई | आयपीएल २०२२मध्ये सुसाट धावणाऱ्या गुजरात टायटन्सचा विजयीरथ सनरायझर्स हैदराबादने आज डी. वाय. पाटील स्टे़डियमवर थांबवला. विल्यमसनची अर्धशतकी खेळी आणि अभिषेक शर्माने जोडलेल्या महत्त्वपूर्ण धावांच्या जोरावर हैदराबादने गुजरातच्या १६३ धावांचा यशस्वी पाठलाग केला आणि ८ गडी राखून विजय नोंदवला. या सामन्यात विल्यमसनने टॉस जिंकत पहिली गोलंदाजी घेतली. कप्तान हार्दिक पंड्याच्या अर्धशतकाच्या जोरावर गुजरातने हैदराबादला २० षटकात १६३ धावांचे आव्हान दिले होते.
हैदराबादचा डाव
मागच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केलेल्या अभिषेक शर्मा आणि केन विल्यमसनने आजही हैदराबादला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ६४ धावा जोडल्या. गुजरातचा फिरकीपटू राशिद खानने अभिषेकला (४२) अर्धशतक पूर्ण करून दिले नाही. त्यानंतर आलेला राहुल त्रिपाठी (१७) रियायर्ड हर्ट झाला. कप्तान केन विल्यमसनने आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने २ चौकार आणि ४ षटकारांसह ५७ धावांची खेळी केली. स्फोटक फलंदाज निकोलस पूरनने १८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ३४ धावांची खेळी करत १९.१ षटकात विजयावर शिक्कामोर्तब केले.
Nicholas Pooran hits the winnings runs as @SunRisers win by 8 wickets against #GujaratTitans
Scorecard – https://t.co/phXicAbLCE #SRHvGT #TATAIPL pic.twitter.com/F5o01VSEHv
— IndianPremierLeague (@IPL) April 11, 2022
गुजरातचा डाव
स्पर्धत चांगल्या फॉर्मात असणाऱ्या शुबमन गिलला आज सनरायझर्स हैदराबादविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर तो झेलबाद झाला. राहुलने शुबमनचा (७) भन्नाट एकहाती झेल घेतला. त्यानंतर मॅथ्यू वेड, साई सुदर्शन आणि डेव्हिड मिलर ठराविक अंतराने बाद होत राहिले. गुजरातचा कप्तान हार्दिक पंड्याने दमदार फलंदाजी केली. तर तीन जीवदावन मिळालेल्या अभिनव मनोहरने ५ चौकार आणि एका षटकारासह ३५ धावा जोडल्या. शेवटच्या षटकात हार्दिकला मोठी फटकेबाजी करता आली नाही. याच षटकात त्याने अर्धशतक पूर्ण केले. हार्दिकने ४ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. २० षटकात गुजरातने ७ बाद १६२ धावा केल्या. हैदराबादकडून भुवनेश्वर आणि नटराजनने प्रत्येकी २ बळी घेतले.