औरंगाबाद (प्रतिनिधी)- औरंगाबाद येथील आंतरराष्ट्रीय गिर्यारोहक प्रा. मनीषा वाघमारे यांनी नेपाळ येथे स्थित असलेल्या हिमालय पर्वत रांगेतील आमा दबलम पर्वत (6812 mtr/ 22349 Ft. उंच) 15 नोव्हेंबर रोजी यशस्वीरीत्या सर करून तेथे भारताचा तिरंगा फडकावला. तसेच शिखरमाथ्यावर आपल्या देशाचे राष्ट्रगान गाऊन देशाचा अभिमान वाढवला. विशेष बाब म्हणजे विंटर सिसन मध्ये हा पर्वत सर करणाऱ्या मनीषा वाघमारे या पहिल्या भारतीय महिला ठरल्या आहेत.
आमा दबलम हे पूर्वेकडील नेपाळ मध्ये स्थित हिमालयातील चढाई करण्यासाठी तांत्रिकदृष्ट्या अत्यंत कठीण आणि अवघड असा पर्वत आहे. या पर्वताचा मुख्य शिखरमाथा समुद्र सपाटीपासून 6812 मी. उंच तर पश्चिमी शिखर 6170 मी. उंच आहे. मनीषा यांना पर्वत सर करताना अनेक ग्लेशियर तसेच खडकाळ भागातून अवघड चढाई करावी लागली. येथील तापमान साधारण -5 अंश सेल्सिअस आहे. या प्रचंड थंड वातावरणात जोऱ्याच्या येणाऱ्या वाऱ्याशी सामना करत तसेच अनेक अडचणींना तोंड देत मोठ्या धाडसाने दिनांक 15 नोव्हेंबर रोजी शिखर माथ्यावर यशस्वी चढाई केली. दिनांक 17 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 वाजता मनीषा या बेस कॅम्पवर म्हणजेच पर्वताच्या पायथ्याशी परतल्या.
या बरोबरच 8 नोव्हेंबर रोजी मनीषा वाघमारे यांनी हिमालयातील माऊंट इसलॅड (Mt. Island Peak) (6160 मी.) यशस्वीरीत्या सर केला. हा पर्वत संपूर्ण बर्फाच्छादित असल्याने याला इसलॅड असे देण्यात आले होते.
तसे या शिखराचे नाव इमजा त्से (Imja Tse) असे आहे. मनीषा यांनी यापूर्वी आशिया खंडातील तसेच जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट, दक्षिण आफ्रिकेतील माऊंट किलीमांजारो, युरोप खंडातील माऊंट एल्ब्रस, ऑस्ट्रेलिया खंडातील माऊंट कोझियस्को, दक्षिण अमेरिकेतील माऊंट अकांकागोआ हे सर्वोच्च शिखरे पादाक्रांत केलेली आहेत.
या त्यांच्या धाडसी पराक्रमाबद्दल महात्मा गांधी मिशन विद्यापीठाचे कुलपती अंकुशरावजी कदम , माजी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर, मराठवाडा लीगल अँड जनरल एज्युकेशन सोसायटीच्या सचिव ॲड. डॉ. कल्पलता भारस्ववाडकर पाटील, महिला महाविद्यालयाच्या प्राचार्या वसुधा पुरोहित, कमांडर विनोद नरवडे, डॉ. शशिकांत सिंग, प्राचार्य प्रा. डॉ. शत्रुंजय कोटे,डॉ. सचिन देशमुख , डॉ. दयानंद कांबळे , नरेंद्र बेलकर,अमित बेलकर , छत्रपती पुरस्कार विजेते रोहन श्रीरामवार, शुभम भावसार ,सुजित इंगळे , ज्ञानेश्वर खंदारे, धीरज बोराडे, दीपक वटाने ,अलका सिंग,अनुराधा दामा देवकर , विजय वाघमारे, आदी मित्रपरिवाराने त्यांचे अभिनंदन केले. या त्यांच्या मोहिमेसाठी त्यांना टीम मिशन गो फॉर सेव्हन समिटमधील सदस्यांचे पाठबळ लाभले.