अरुणा तंवर ऑलिम्पिक साठी पात्र ठरलेली पहिली प्यारा तायक्वांदो खेळाडू ठरली आहे. ती पहिल्या सामन्यातच जखमी झाल्यानंतरही ज्या पद्धतीने ती लढली ते पाहता तीच्या जिद्दीला सलाम करावा लागेल. रेपचेंज राऊंड पर्यंत पोहोचल्यानंतर जखमी असल्याने तिला डॉक्टरांनी खेळण्यासाठी परवानगी नाकारल्याने तिचे पदक जिंकण्याचे स्वप्न अपुरे राहिले. तरी देखील अरुणा ही भारतीय तायक्वांदो खेळाडूंसाठी रोल मॉडेल ठरणार आहे. भारतीय तायक्वांदोचे नाव ऑलम्पिक पर्यंत पोहोचणारी, भारताचा तिरंगा आलिम्पिक मध्ये फडकावणारी ती पहिली तायक्वांदो खेळाडू ठरली आहे, त्यामुळे सर्वसामान्य कुटुंबात जन्म घेतलेले असंख्य खेळाडू अरूणा कडून प्रेरित होऊन आता ऑलम्पिक ची स्वप्न पहायला निश्चित सुरुवात करतील. आजवर इतिहासात भारताचा कुठलाही खेळाडू ऑलिंपिक पर्यंत मजल मारू शकलेला नाही. त्यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत असू शकतील तो एक स्वतंत्र विषय आहे, परंतु अरुणा हिने एक आशेचा किरण भारतीय खेळाडूंना दाखवला आहे.
यामध्ये इंडिया ताइक्वांडो चे अध्यक्ष तथा भारतीय ऑलम्पिक असोसिएशनचे सहसचिव श्री नामदेव शिरगावकर यांचे प्रयत्नही फार मोलाचे ठरले. अरुणाला आलिम्पिक कोटा मिळवून देण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्नांमुळे अरुणा प्यारा आलिम्पिक साठी पात्र ठरली. तसं पाहिलं तर भारतीय तायक्वांदो खेळाडूंमध्ये गुणवत्तेची कधीच वानवा राहिली नाही. अतिशय प्रतिभावान खेळाडू भारतात होऊन गेले मात्र ऑलिंपिक खेळण्याचे त्यांचे स्वप्न पूर्ण होऊ शकत नाही. खेळाडूंना मिळणारे योग्य मार्गदर्शन व संधी यापूर्वी खेळाडूंना उपलब्ध झाल्या नाहीत असेच म्हणावे लागेल. भारतीय तायक्वांदो खेळाडूंसाठी विदेशी प्रशिक्षक नेमण्यापासून त्यांचे विदेशात ट्रेनींग घेणे, त्यांना विविध सुविधा निर्माण करून देण्यासाठी ही यापूर्वी निश्चित प्रयत्न झाले, मात्र खेळाडूंना आलिम्पिक साठी पात्र होता आलं नाही, हे भारतीय तायक्वांदोचे वास्तव नाकारून चालणार नाही. अंतर्गत गटबाजी मध्ये देश पातळीवरच गटांमध्ये विखुरलेला तायक्वांदो कुठेतरी स्थिरावत आहे असं अनेकदा वाटलं, परंतु सत्तेच्या रस्सीखेच मध्ये विखुरलेले गट-तट लढत राहिले व खेळाडूंसाठी दूरदृष्टी ठेवून परदेशी खेळाडूंना मिळत असलेल्या दर्जेदार सुविधांच्या तुलनेत भारतीय तायक्वांदो खेळाडूंसाठी नियोजन झाले नाही. भारतामध्ये इतर प्रगत देशांच्या तुलनेत शासकीय निवासी क्रीडा योजनांचा अभाव, खेळाडूंचे अधांतरी भविष्य, दर्जेदार प्रशिक्षकांची कमतरता, सुविधांचा अभाव अशा अनेक गोष्टींमुळे भारतातील तायक्वांदो ला आज पर्यंत मोठे यश मिळवता आलं नाही.
महाराष्ट्रात देखील तायक्वांदो खेळात प्रचंड गुणवत्ता असणारे दिग्गज खेळाडू आहेत. बाल गटापासून तर ज्युनिअर गटात पर्यंत तसेच शालेय गटांमध्ये महाराष्ट्रातील खेळाडूंचा देशपातळीवर नेहमीच वरचष्मा राहिला आहे. मात्र पुढे जाऊन ही कामगिरी खालावते. वरिष्ठ गटात पोहोचेपर्यंत अनेक चांगले खेळाडू करिअरच्या संधी शोधत खेळाला राम राम ठोकतात. एक दशकापूर्वी पर्यंत केवळ मुंबई , पुणे या मोठ्या शहरांपर्यंत मर्यादित का खेळ आता छोट्या शहरापर्यंत पोहोचला आहे. गेली काही वर्षे या खेळात पुणे जिल्ह्याचे निर्विवाद वर्चस्व आहे. पुणे, मुंबई पलीकडे आता मराठवाड्यात औरंगाबाद , बीड या जिल्ह्यांचे खेळाडू देशपातळीवर नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत झेप घेताना दिसत आहेत. विदर्भामध्ये नागपूर, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर , सांगली, अहमदनगर, खानदेशात जळगाव व धुळे या जिल्ह्यांमध्ये देखील आता राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळाडू सातत्याने खेळताना दिसतात.
एकूणच भारतात अजूनही क्रीडा क्षेत्राकडे दुय्यम पर्याय म्हणून पाहिले जाते. 135 कोटीं लोकसंख्या असलेल्या या देशाची टोकियो आलिम्पिक 2020 मधील पदकांची संख्या पाहिली तर आपल्याला अजून खूप मोठा पल्ला गाठायचा आहे हे लक्षात येईल. भारतामध्ये दिल्ली, हरियाणा मणिपूर, पाठोपाठ आता केरळ, मध्य प्रदेश व गुजरात मध्ये तायक्वांदो खेळाडूंना जास्त प्रमाणात सुविधा मिळत असल्याने त्या ठिकाणी तायक्वांदो आकार घेतानाचे आशावादी चित्र देश पातळीवरील स्पर्धांमध्ये दिसते. कारण त्या ठिकाणी राज्य सरकारांनी सुरू केलेल्या निवासी स्पोर्टस योजनांमुळे हे घडत आहे. महाराष्ट्रात देखील असाच क्रीडा प्रबोधिनीच्या धर्तीवर तायक्वांदो खेळाला ही राजाश्रय प्राप्त झाला तर निश्चितच महाराष्ट्रातील तायक्वांदो खेळाडूंची आंतरराष्ट्रीय स्पर्धां मधील कामगिरी सुधारेल व ऑलिंपिक पात्रतेचा व पदक जिंकण्यासाठी पल्ला गाठता येईल.