इंदूर | प्रतिनिधी
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातील तिसऱ्या टी-२० सामन्यात भारताने १४ धावांनी रोमहर्षक विजय मिळवला आहे. इंदूरमधील होळकर स्टेडियमवर झालेल्या या लढतीत अभिषेक शर्माने स्फोटक अर्धशतक झळकावले, मात्र तरीही त्याला सामनावीरचा (Man of the Match) किताब मिळाला नाही. त्याच्या ऐवजी हा बहुमान वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगला देण्यात आला. या महत्त्वपूर्ण विजयासह भारतीय संघाने मालिकेत २-१ अशी आघाडी घेतली आहे.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने २२३ धावांचा मोठा डोंगर उभा केला. भारताच्या डावात अभिषेक शर्माने अवघ्या ३० चेंडूंचा सामना करताना ६९ धावांची तुफानी खेळी केली. त्यामुळे त्यालाच सामनावीर म्हणून गौरविले जाईल अशी दाट शक्यता होती. त्याच्यासोबतच इशान किशनने १८ चेंडूत ३७, तिलक वर्माने १६ चेंडूत २८ आणि अक्षर पटेलने १४ चेंडूत २० धावांचे मोलाचे योगदान दिले.
भारतीय संघाने दिलेल्या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजचा संघ अत्यंत धोकादायक स्थितीत पोहोचला होता आणि एक वेळ सामना भारताच्या हातून निसटतोय असे वाटत होते. मात्र, अर्शदीप सिंगच्या उत्कृष्ट गोलंदाजीने सामन्याचे चित्रच बदलून टाकले. त्याने ४ षटकांत ४४ धावा देत ३ महत्त्वाचे बळी टिपले. एका अचूक यॉर्करवर त्याने धोकादायक शेर्फेन रदरफोर्डला बाद करून वेस्ट इंडिजच्या विजयाच्या आशा संपुष्टात आणल्या. याआधी त्याने शाई होपला त्रिफळाचीत केले होते, तर कीमो पॉलला तिलक वर्माच्या हाती झेल देण्यास भाग पाडले. वेस्ट इंडिजला २० षटकांत ७ बाद २०९ धावांपर्यंतच मजल मारता आली. गोलंदाजीत नमन धीरनेही दोन गडी बाद केले.
सामनावीर पुरस्कार स्वीकारल्यानंतर अर्शदीप सिंगने आपल्या भावना व्यक्त केल्या. तो म्हणाला की, आज वातावरण चांगले होते आणि चेंडू किंचित रिव्हर्स होत होता. मागील सामन्यात दवामुळे अडचणी आल्या होत्या, पण आज ठरलेल्या योजनेनुसार अचूक गोलंदाजी करता आली. संघातील वातावरणाबद्दल बोलताना त्याने सांगितले की, संघात कोणीही वरिष्ठ किंवा लीडर नाही, येथील वातावरण खूप मैत्रीपूर्ण आणि शांत आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळताना चांगले आणि वाईट दिवस येतातच, त्यामुळे शांत मनाने खेळणे आवश्यक असते. सुरुवातीला नव्या चेंडूने आणि नंतर जुन्या चेंडूने योग्य लाईन आणि लेंथवर मारा करणे हेच आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचेही त्याने स्पष्ट केले.






