जालना(प्रतिनिधी) – या धावपळीच्या युगात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे. व्यायामासाठी वेळ मिळत नाही, अशा परिस्थितीत प्रत्येकाने आपल्या आवडत्या खेळाचा छंद जोपासावा. कारण खेळामुळे सर्वांग व्यायाम होतो, असे प्रतिपादन शिवसेनेचे शहरप्रमुख तथा नगरसेवक विष्णू पाचफुले यांनी येथे केले.
जुन्या एमआयडीसीत केनियाज टर्फमध्ये आयोजित जालना जिल्हा बॅडमिंटन चॅम्पियनशिप स्पर्धेतील विजेत्यांना विष्णू पाचफुले यांच्याहस्ते बक्षीस वितरण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अभयकुमार अग्रवाल, पांडुरंग खैरे आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पाचफुले पुढे म्हणाले की, क्रीडा क्षेत्रातही आता मोठ्या प्रमाणात करिअरच्या संधी निर्माण झाले आहेत. सोबतच खेळाडूंना नोकरीसाठी विशेष आरक्षण मिळते. त्यामुळे कोणता का होईना खेळ खेळला पाहिजे, ही बाब सुदृढ आरोग्यासाठी महत्वाची आहे. आरोग्य हीच खरी संपत्ती असून, ती टिकविण्यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्यासाठी थोडा वेळ दिला पाहिजे, असे सांगून त्यांनी या चॅम्पियनशिपमधील विजेत्या आणि उपविजेत्या संघाचे अभिनंदन करून पराभूत संघांनी निराश न होता,
अधिक जोमाने सरावावर भर देऊन पुढील सामन्यात यशाचा पाठलाग करावा, असे आवाहन विष्णू पाचफुले यांनी केले.
या चंपियनशिपमध्ये दत्ता पाटील यांचा संघ विजेता ठरला. या संघात त्यांच्यासह अविनाश राठोड, विक्रांत चीलकरवार, निलेश भारूका, शशांक बगडिया, माधव चेचानी यांचा समावेश होता. महेंद्र सकलेचा यांचा संघ उपविजेता ठरला. त्यात त्यांच्यासह नागोजी चिलकरवार, आशुतोष दायमा, सज्जन सकलेचा, धनंजय लोंढे पाटील, अनुप गिंडोडिया यांचा समावेश होता.
मुलींच्या गटात परुल आगीवाल हिच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला तर दर्शना मखाना हिच्या संगाने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या आणि उपविजेत्या संघांना विष्णू पाचफुले यांच्या हस्ते ट्रॉफी व पारितोषिक वितरण करण्यात आले.
यावेळी संघटनेचे पदाधिकारी तथा आयोजन समितीचे सदस्य समाधान डोंगरे, मनोज पगारे, सुरज गवळी, आकाश पवार यांच्यासह राम भुतेकर, साई पाचफुले, क्रीडारसिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.