दरायस नरिमन ‘क्रीडा पितामह’ पुरस्काराचे पहिले मानकरी
लॉन टेनिसपटू दरायस नरिमन हे पहिले मानकरी ठरले

छत्रपती संभाजीनगर(प्रतिनिधी): एम पी पी स्पोर्ट्स पार्क, छत्रपती संभाजीनगर, यांच्यावतीने देण्यात आलेल्या ‘क्रीडापितामह’ या पुरस्काराचे लॉन टेनिसपटू दरायस नरिमन हे पहिले मानकरी ठरले. त्यांचा मनोज लोहिया, पोलीस आयुक्त छत्रपती संभाजीनगर यांच्या हस्ते शाल व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
छत्रपती संभाजीनगर येथील मीरा प्रभाकर पांडे स्पोर्ट्स पार्क व पिकनिक सेंटर यांच्यावतीने यावर्षीपासून क्रीडा क्षेत्रात 50 व त्यापेक्षा अधिक कार्यकाळासाठी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जेष्ठ नागरिकांसाठी ‘क्रीडापितामह’ या पुरस्काराने सन्मान करण्याचे नियोजन करण्यात आले. अॅड. गोपाळ पांडे यांच्या पुढाकाराने सदरील पुरस्काराची संकल्पना पुढे आली. यासाठी नियम व अटी करण्यासाठी पुरस्कार निवड समिती गठित करण्यात आली. या समितीचे अध्यक्ष म्हणून डॉ. मकरंद जोशी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सदरील समितीच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगरातील क्रीडा क्षेत्रात 50 व त्यापेक्षा अधिक कार्यकाळासाठी सातत्याने मैदान गाजवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी हा पुरस्कार देण्याचे निश्चित झाले. समितीच्या वतीने या पुरस्कारासाठी सन 2023 साठी लॉन टेनिस, बॅडमिंटन व टेबल टेनिस चे उत्कृष्ट खेळाडू दरायस नरिमन यांची निवड करण्यात आली. ते 73 वर्षाचे असून आजही सातत्याने लॉन टेनिस अतिशय उत्कृष्टरित्या खेळतात.
या समारंभा दरम्यान अलविरा मिर्झा हिने दहावी सीबीएससी बोर्डात ९७.४० टक्के गुण मिळवल्याबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी एम पी पी स्पोर्ट्स पार्क चे संस्थापक गोपाळ पांडे पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष डॉ. मकरंद जोशी, मिसेस लोहिया, मिसेस नरिमन आदी उपस्थित होते.
यावेळी लॉन टेनिस, बॅडमिंटन या खेळाचे ज्येष्ठ खेळाडू, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अॅड. बलराज पांडे यांनी केले. मनोज लोहिया यांनी दरायस नरीमन यांच्या लॉन टेनिस खेळाविषयीच्या अनेक आठवणींना यावेळी उजाळा दिला. आजही त्यांना लॉन टेनिस मध्ये हरवणे अतिशय कठीण आहे, असे गौरवोद्गार यावेळी त्यांनी काढले.
Comments are closed.