पुणे (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय तायक्वांदो स्पर्धांसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यास औरंगाबाद येथील स्पर्धेपूर्वी दिल्ली उच्च न्यायालय मनाई केली असताना “इंडिया तायक्वांदो” कडून आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी रॅंकिंगचे आमिष दाखवून नाशिक येथे आयटी ओपन रँकिंग राष्ट्रीय तायक्वांदो कॉम्पिटिशन 2022 आयोजन करण्यात आले आहे. खेळाडूंनी अशा आमिषाला बळी पडू नये, असे आवाहन तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्र (मुंबई ) चे महासचिव मिलिंद पठारे यांनी केले आहे.
११ ते १४ जून २०२२ दरम्यान विभागीय क्रीडा संकुल, पंचवटी, नाशिक येथे इंडिया तायक्वांडो (IT) द्वारा आयोजित आय.टी.ओपन रॅंकिंग राष्ट्रीय तायक्वांडो स्पर्धा 2022 होत आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने दिनांक १५ फेब्रुवारी २०२२ रोजी दिलेल्या आदेशानुसार उपरोक्त स्पर्धेची आयोजक संस्था “इंडिया तायक्वांडो(IT)” ही नोंदणीकृत (रजिस्ट्रेशन) नसलेली संस्था आहे, तसेच ही संस्था मान्यता प्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ (NSF) नाही, असे आय टी च्या वकिलाने दिल्ली उच्च न्यायालया समोर सांगितले आहे. तसेच दिल्ली उच्च न्यायालयाने दिनांक २८ मे २०२२ रोजी दिलेल्या आदेशात “तायक्वांडो फेडेरेशन ऑफ इंडिया (TFI) ही संस्था “राष्ट्रीय क्रीडा महासंघ” असून या भारतीय तायक्वांडो महासंघाची (TFI) निवडणूक ६० दिवसांत घेण्याबाबत आदेशीत केलेले आहे.
दरम्यान काळात आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी ३ सदस्यीय खेळाडूंची समिती नियुक्त करुन भारतीय खेळ प्राधिकरण (SAI) ला निवड चाचणी स्पर्धा घेण्याची जबाबदारी दिली आहे. भारतीय खेळ प्राधिकरण (SAI)कडून आशियाई स्पर्धेसाठी लखनौ येथे निवड केलेल्या खेळाडूंची यादी अधिकृत असल्याचे जाहीर करून त्यांची नावे आशियाई स्पर्धेसाठी नोंदणी करण्याचे आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने दिले आहेत. “इंडिया तायक्वांदो” कडून औरंगाबाद येथे आशियाई स्पर्धेसाठी निवड केलेल्या खेळाडूंना आता काय उत्तर द्यायचे? अशा अडचणीत आधीच इंडिया तायक्वांदो सापडली आहे.
फसवणूक झालेल्या खेळाडूंची जबाबदारी आय. टी. घेणार का…?
दिल्ली उच्च न्यायालयाचे तीनही आदेश पाहता आता कोणतेही अधिकृत स्पर्धा घेण्याचे अधिकार ‘इंडिया तायक्वांडो’ (IT) ला नाहीत, तरी देखील ‘आय.टी. ओपन रॅंकिंग तायक्वांडो कोंपेटिशन 2022’ ही स्पर्धा विभागिय क्रीडा संकुल,नाशिक येथे दि. ११ ते १४ जून २०२२ या दरम्यान आयोजित करण्यात आली आहे. ही ‘रॅंकिंग स्पर्धा ” असल्याची माहिती व प्रलोभने दाखवून केवळ नोंदणीसाठी प्रती खेळाडू ५०० रुपये व स्पर्धा प्रवेशासाठी प्रती खेळाडू १८०० ते २५०० रुपये (प्रत्येक खेळाडू एकूण २३०० ते ३००० रुपये) भोजन व निवास व्यवस्था न करता हे अवाढव्य शुल्क आकारले जात आहे. अशा अनधिकृतपणे खुल्या स्पर्धेच्या माध्यमातून खेळाडूंची व पालकांची उघड उघड आर्थिक फसवणूक होत नाही का..?.
इंडिया तायक्वांडो(IT) ही संस्था इंडियन ऑलिंपिक असोसिएशन (IOA ) ला अधिकृतरित्या संलग्न नसल्याचे आपण IOA ची वेबसाइट www.olympic.ind.in तपासून पाहिल्यास लक्षात येईल.दिल्ली उच्च न्यायालयच्या आदेशा नुसार इंडिया तायक्वांडो(IT) ही संस्था नोंदनिकृत नाही. मान्यता प्राप्त राष्ट्रीय क्रीडा महासंघ ही नाही, IOA ला अधिकृत सलग्न नाही, क्रीडा मंत्रालय, भारत सरकार ची मान्यता नाही. मग या स्पर्धांचा अट्टाहास कुठल्या खेळाडूंसाठी आहे..? तुम्ही औरंगाबाद येथे आशियाई स्पर्धेसाठी निवडलेल्या महाराष्ट्र राज्यातील ५ खेळाडूंना दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आशियाई स्पर्धेला पाठवू शकत नाही, या खेळाडूंच्या झालेल्या नुकसानीची जबाबदारी “इंडिया तायक्वांदो (IT) घेणार आहे की नाही..?
त्यामुळे विभागीय क्रीडा संकुल, नाशिक या ठिकाणी “इंडिया तायक्वांडो(IT)” द्वारा आयोजित आय.टी. ओपन रॅंकिंग तायक्वांडो कोंपीटिशन 2022 या स्पर्धेला काहीही अर्थ नाही. या स्पर्धेच्या प्रमाणपत्रांना कोणत्याही क्रीडा सुविधा मिळणार नाहीत. पुन्हा एकदा खेळाडूंची फसवणूक व आर्थिक लूट होणार आहे. प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रशिक्षक व खेळाडूंनी याबाबत विचार करून आपण आपल्या खेळाडूंना चुकीच्या मार्गाने जाण्यासाठी प्रव्रुत्त करू नये, असे सर्व जिल्हा असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी व प्रशिक्षक यांना मिलिंद पठारे यांनी आवाहन केले आहे.