पंचकुला (प्रतिनिधी): टेबल टेनिस, लॉन टेनिस आणि जलतरणमध्ये महाराष्ट्राने सुवर्ण सूर मारला. मल्लखांब, सायकलिंगमध्येही पदके मिळाली. बॉक्सिंगमध्येही ९जणांनी विविध गटांमध्ये पदकाकडे कूच केली आहे. ते सर्व जण उपांत्य फेरीपर्यंत पोहचले आहेत. तीन सुवर्ण, ४ रौप्य तर ५ कांस्य पदके मिळाली.
लॉन टेनिसमध्ये आकांक्षा निठुरे हिने कर्नाटकच्या सुहिथा मयुरीला पराभूत केले. दुहेरीत वैष्णवी आडकर आणि सुदिप्ता यांना रौप्यपदक मिळाले. त्यांना तमीळनाडूच्या लक्ष्मीप्रभा आणि जननी रमेशने हरवले. दुहेरीत आकांक्षा निठुरे व रूमा गायकैवारीने व एकेरीत वैष्णवी आडकरने कांस्य पदक पटकावले.
जलतरणमध्ये अपेक्षा फर्नांडिसने २०० मीटरमध्ये विक्रम प्रस्थापित केला. तिने २.२५.१० अशी विक्रमी वेळ नोंदवली. यापूर्वी किनिषा गुप्ताचा २.२५.८० असा विक्रम होता. ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये भक्ती वाडकर, अपेक्षा फर्नांडिस, संजिती साहा, आन्या वाला यांचा संघ होता. पलक जोशीने २००मीटर बॅकस्ट्रोकमध्ये रौप्य (२.२७.०१), रिषभ दासने २०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये कांस्य (२.१२) पटकावले. मल्लखांबमध्ये वैयक्तिक प्रकारात प्रणाली मोरेने कांस्य पदक मिळवले.
टेबल टेनिसमध्ये मुलींच्या दुहेरीत मुंबईच्या दिया चितळे व स्वस्तिका घोष यांनी हरियानाच्या प्रिथोकी चक्रवर्ती व सुहाना सैनी यांना तीन सेटमध्ये हरवले.
पदकाचे विवरण
टेबल टेनिस – सुवर्ण (दिया चितळे-स्वस्तिका घोष)
लॉन टेनिस – आकांक्षा निठुरे (सुवर्ण) दुहेरीत तिला व रूमा गायकैवारी (कांस्य), वैष्णवी आडकर (कांस्य)
मल्लखांब – प्रणाली मोरे (कांस्य)
जलतरण ः २०० मीटर – अपेक्षा फर्नांडीस – (सुवर्ण), बॅकस्ट्रोक – पलक जोशी (रौप्य), रिले – ४ बाय ४०० – (रौप्य), रिषभ दास – (कांस्य)
रोड सायकलिंग – सिद्धेश पाटील (रौप्य, मास स्टार्ट)
खो-खोमध्ये दोन्ही संघ सेमिफायनलमध्ये
मुलांचा खो-खो सामना पश्चिम बंगालसोबत झाला. पहिल्या डावात दोन गुणांनी (१०-८) पिछाडीवर पडलेल्या महाराष्ट्राने दुसऱ्या डावात चांगला खेळ करीत दहा गडी बाद केले. त्यात तीन गुणांनी विजय मिळवला. मुलींनी पंजाबच्या संघाला एक डाव दोन गुणांनी पराभूत केले.