इंग्लंड क्रिकेटमधील वर्णद्वेषाची मुळे खोलवर खोदण्याची मोहीम सुरू करणारा क्रिकेटपटू अझीम रफिक याच्या खुलाश्यानंतर अनेक क्रिकेटपटूंची नावे समोर आली असून, इंग्लिश काउंटी क्रिकेटमध्ये खळबळ उडाली आहे. रफिकने अलीकडेच ब्रिटीश खासदारांसमोर आपल्या साक्षीत खुलासा केला होता की, यॉर्कशायर काउंटीकडून खेळताना भारताचा दिग्गज फलंदाज चेतेश्वर पुजाराला या गोष्टींचा सामना करावा लागला होता. त्याला स्टीव्ह या नावाने हाक मारली जात होती, जी वर्णद्वेषी प्रकारात मोडते. या आरोपांच्या भोवऱ्यात आलेल्या एका इंग्लिश क्रिकेटपटूने आता आपल्या वर्तनाबद्दल माफी मागितली आहे. जॅक ब्रूक्स नावाच्या या खेळाडूने चेतेश्वर पुजाराशी बोलून त्याची माफी मागितली. तसेच ब्रूक्सविरुद्ध ९ वर्षांपूर्वी केलेल्या वांशिक ट्विटचीही चौकशी सुरू आहे.
सॉमरसेटकडून खेळणाऱ्या ब्रूक्सला त्याच्या वागणुकीबद्दल आणि जुन्या ट्विट्सबद्दल क्लबने फटकारले आहे. २०१२ मध्ये ब्रूक्सने इंग्लंड संघाचा वेगवान गोलंदाज टायमल मिल्सच्या ट्विटला उत्तर देताना वर्णद्वेषी शब्द वापरले होते. ब्रूक्सने गुरुवारी (१८ नोव्हेंबर) रोजी माफी मागून एक निवेदन जारी केले. त्याने त्यात लिहिले, ‘मी मान्य करतो की, मी २०१२ मध्ये केलेल्या दोन ट्विटची भाषा अस्वीकार्य होती. ते शब्द वापरल्याबद्दल मला खेद वाटतो. याबद्दल मी मनापासून माफी मागतो.”
यॉर्कशायर काउंटीचा माजी क्रिकेटपटू अझीम रफिक याने अलीकडेच ब्रिटीश संसदेच्या समितीसमोर साक्ष दिली, ज्यामध्ये त्याने यॉर्कशायर क्रिकेट संघाच्या खेळाडूंवरील वांशिक वागणूक आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्या क्लबच्या अधिकाऱ्यांच्या प्रयत्नांविरुद्ध पुरावे सादर केले. त्यानंतर, इतर काही खेळाडूंनीही पुढे येऊन वांशिक अत्याचाराची तक्रार केली आणि सध्या इंग्लंड क्रिकेट बोर्ड या प्रकरणांवर कारवाई करण्यात गुंतले आहे. त्याचाच भाग म्हणून यॉर्कशायर क्लबला प्रथम श्रेणी तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामने आयोजित करण्यापासून थांबवले गेले आहे.