एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेच्या ६ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी आणि ऑस्ट्रेलिया-न्यूझीलंड २०२३ येथे होणाऱ्या विश्वकरंडक स्पर्धेच्या पात्रतेचा मार्ग आता अधिक मोकळा झाला आहे. एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ फुटबॉल स्पर्धेच्या रंगतदार साखळी लढतीनंतर आता बाद फेरीसाठी आठ संघ निश्चित झाले आहेत.
आठवेळचे विजेते चीन, गतविजेते जपान, ऑस्ट्रेलिया, महिला आशिया कप २०१० विजेते कोरिया प्रजासत्ताक, चायनीज तैपेई, फिलिपीन्स, व्हिएतनाम आणि थायलंड हे आठ संघ आता उपांत्यपूर्व फेरीत दाखल झाले आहेत. या संघाची एकूण कामगिरी बघता आता ३० जानेवारी रोजी होणारे सामने अधिक उत्कंठावर्धक होणार आहेत.
या स्पर्धेतील पहिले पाच संघ पुढील वर्षी होणाऱ्या महिला विश्वकरंडक स्पर्धेसाठी , तर दोन संघ इंटर कॉन्फेडरेशन प्ले ऑफ लढतीसाठी पात्र ठरणार आहेत. यामुळे या फेरीची रंगत अधिक वाढली आहे .विश्वकरंडक स्पर्धेचे यजमान म्हणून ऑस्ट्रेलिया यापूर्वीच विश्वकरंडक स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. त्यामुळे फिलिपिन्स संघाच्या प्रगतीवर सगळे अवलंबून असणार आहे.
एएफसी वुमन्स आशिया कप भारत २०२२ स्पर्धेत ऑस्ट्रेलिया संघ उपांत्य फेरीसाठी पात्र ठरल्यास चार पराभूत संघ २ फेब्रुवारी रोजी डी.वाय. पाटील मैदानावर होणाऱ्या प्ले ऑफ लढतीत खेळतील. या लढतीतील दोन विजेते विश्वकरंडक स्पर्धेसाठी थेट पात्र ठरतील, तर पराभूत संघ इंटर कॉन्फेडरेशन प्ले ऑफ स्पर्धेत खेळतील.
ऑस्ट्रेलियाची मोहिम उपांत्यपूर्व फेरीतच खंडित झाली, तर उपांत्यपूर्व फेरीतील तीन पराभूत संघ प्ले ऑफ लढतीत एकाच राऊंड रॉबिन पद्धतीत खेळतील. विजेता संघ विश्वकरंडक स्पर्धेत खेळेल, तर उर्वरित दोन संघ इंटर कॉन्फेडरेशन स्पर्धेत खेळतील.