छत्रपती संभाजीनगर | प्रतिनिधी
महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) प्रतिष्ठित ‘वरिष्ठ पुरुष निमंत्रण लीग’ स्पर्धेसाठी छत्रपती संभाजीनगर वरिष्ठ क्रिकेट संघाची निवड चाचणी सोमवारी (३०) आयोजित करण्यात आली आहे. दुपारी २ वाजता एडीसीए क्रिकेट मैदानावर ही चाचणी पार पडणार आहे. औरंगाबाद जिल्हा क्रिकेट संघटनेचे सचिव शिरीष बोराळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, इच्छुक खेळाडूंनी वयाचा पुरावा देणाऱ्या आवश्यक कागदपत्रांसह मैदानावर उपस्थित राहावे. यासंदर्भातील अधिक माहितीसाठी खेळाडूंनी चेअरमन अनंत नेरळकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
एमसीएच्या वतीने आयोजित केल्या जाणाऱ्या या ‘वरिष्ठ पुरुष निमंत्रण लीग’ला १० डिसेंबर २०२६ पासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत सहभागी होणाऱ्या राज्यातील सर्व झोन, जिल्हा आणि क्लब संघांना त्यांच्या तयारीला सुरुवात करण्याचे तसेच खेळाडूंची नोंदणी वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश एमसीएने दिले आहेत.
स्पर्धेच्या ऑनलाइन नोंदणीसाठी खेळाडूंना काही कागदपत्रे सक्तीची करण्यात आली आहेत. यामध्ये परिपूर्ण भरलेला नोंदणी अर्ज, अलीकडील पासपोर्ट आकाराचा फोटो, आधार कार्डची प्रत आणि अपडेटेड हिस्ट्री, तसेच डिजिटल जन्म दाखला अनिवार्य आहे. २३ वर्षांखालील आणि त्याखालील वयोगटातील खेळाडूंसाठी सध्याच्या शैक्षणिक वर्षाचे शाळा किंवा महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र असणे आवश्यक राहील.
नोकरी करणाऱ्या खेळाडूंना नियोक्त्याचे प्रमाणपत्र, मागील वर्षीच्या १ सप्टेंबरपासूनच्या १२ महिन्यांच्या पगार स्लिप्स आणि १ सप्टेंबर २०२५ पासून ऑनलाइन नोंदणीच्या तारखेपर्यंत बँकेत पगार जमा झाल्याचे स्टेटमेंट जोडणे बंधनकारक करण्यात आले आहे.
ऑनलाइन नोंदणी पूर्ण केल्यानंतर जास्तीत जास्त २५ खेळाडूंची नोंदणीकृत संघयादी आणि सर्व मूळ कागदपत्रांच्या प्रत्यक्ष (भौतिक) प्रती ३ डिसेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत एमसीएच्या मुख्य कार्यालयात सादर करणे सक्तीचे आहे. या संघयादीत परराज्यातील किंवा बाहेरील (आऊटस्टेशन) खेळाडूंचा स्पष्ट उल्लेख असणे गरजेचे आहे. स्थानिक खेळाडूंच्या पात्रतेसंदर्भातील नियम एमसीएच्या संकेतस्थळावरील स्पर्धा नियमावलीत पाहता येतील.
सर्व खेळाडूंच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित झोन, जिल्हा किंवा क्लबच्या पदाधिकाऱ्यांवर असणार आहे. कोणत्याही कागदपत्रात बनावटगिरी किंवा फेरफार झाल्याचे उघडकीस आल्यास, संबंधित खेळाडूसह त्या जिल्हा, झोन किंवा क्लबवर कठोर कारवाई केली जाईल, असा सक्त इशारा एमसीएच्या वतीने देण्यात आला आहे.











