स्पोर्ट्स पॅनोरमा | प्रतिनिधी
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि नामिबिया येथे पुढील वर्षी होणाऱ्या वनडे वर्ल्ड कप २०२७ मध्ये विराट कोहली आणि रोहित शर्मा खेळणार की नाही, या दीर्घकाळ सुरू असलेल्या चर्चेवर आता पडदा पडला आहे. बीसीसीआयचे अध्यक्ष मिथुन मन्हास यांनी स्पष्ट केले आहे की, विश्वचषकासाठी या दोन्ही दिग्गज खेळाडूंची निवड केवळ फिटनेस आणि प्रदर्शन या दोन अटींच्या आधारावरच होईल, त्यांच्या निवडीत वयाचा कोणताही अडथळा येणार नाही.
टीम इंडिया आता न्यूझीलंडच्या मोठ्या दौऱ्यावर जाणार असून त्यापूर्वी ‘स्पोर्ट्सस्टार’शी संवाद साधताना मन्हास यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, “माझ्या दृष्टीकोनातून निवडीसाठी फिटनेस आणि प्रदर्शन हेच निकष असले पाहिजेत. वय अजिबात मुद्दा नसावा. एखादा खेळाडू फिट आहे, चांगलं प्रदर्शन करतोय आणि देशासाठी सामने जिंकून देतोय, तर हीच गोष्ट आवश्यक आहे.” वरिष्ठ खेळाडूंची विश्वचषकासाठीची निवड केवळ कामगिरीवरच अवलंबून असेल, हे त्यांनी अधोरेखित केले.
याआधी अजित आगरकर यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीने रोहित शर्माच्या जागी यशस्वीला संघात संधी देण्याचा पूर्ण प्लान आखला होता. परंतु, इंग्लंडमधील दमदार कामगिरीच्या जोरावर रोहितने आपले स्थान कायम राखले. भारताला गेल्या वर्षीच्या वनडे वर्ल्ड कपमध्ये उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते. २०२३ मध्ये रोहितच्याच नेतृत्वाखाली संघाने अंतिम फेरी गाठली होती, मात्र फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता.
सद्यस्थितीत रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी टी-२० आणि कसोटी फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली असून, आता ते भारतासाठी फक्त वनडे क्रिकेट खेळतात. आगामी वर्ल्ड कप अभियानाबाबत बोलताना मन्हास म्हणाले की, शुबमन गिल हा टीम इंडियाव्यतिरिक्त गेल्या दोन-तीन वर्षांपासून गुजरात टायटन्सचा कर्णधार आहे, ज्याचा अनुभव त्याला नक्कीच कामी येईल. संघात विराट, रोहित आणि हार्दिक असल्यास गिलला त्याचा लाभ मिळेल. तसेच जसप्रीत बुमराहदेखील नेतृत्व करू शकतो. अनुभवी शुबमनच्या आसपास इतर अनुभवी खेळाडू असणे फायद्याचे ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
दरम्यान, कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात शुबमन गिल (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल (उपकर्णधार), देवदत्त पडिक्कल, ऋषभ पंत (विकेटकीपर), ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, अंशुल कंबोज, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा, आकाश दीप, साई सुदर्शन, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, कुलदीप यादव आणि मोहम्मद सिराज यांचा समावेश आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- परदेशी लीगमधील भारतीय खेळाडूंबाबत बीसीसीआयने भूमिका केली स्पष्ट, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या जबाबदारीवरही भाष्य
- क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! ICC कडून U19 महिला टी-२० वर्ल्ड कप २०२७ चे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या टीम इंडिया कोणत्या गटात
- झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यानंतर हरमनप्रीत कौर भावूक; मुलाखतीनंतर माईक फेकून गेली पॅव्हेलियनमध्ये










