मुंबई – रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ सध्या चांगली कामगिरी करत आहे. विराट कोहलीने कसोटी संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित आता तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचा कर्णधार आहे. श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रोहित कर्णधार म्हणून मैदानात दिसणार आहे. क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये कर्णधारपदी नियुक्ती झाल्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनने (MCA) ‘हिटमॅन’चा सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. रोहित मुंबईकडून देशांतर्गत क्रिकेट खेळतो.
पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या एमसीएच्या शिखर परिषदेच्या बैठकीत रोहितचा सन्मान करण्याचा निर्णय घेण्यात आला. परिषदेच्या एका सदस्याने सांगितले, “आज सर्वोच्च परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही फॉरमॅटचा कर्णधार बनवल्याबद्दल त्याचा सत्कार करण्याचा निर्णय घेण्यात आला. रोहितशिवाय अंडर-१९ विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर अंगकृष्ण रघुवंशी यालाही एक लाख रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार आहे.
श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात ४४ धावा करणारा रोहित शर्मा या फॉरमॅटमध्ये सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनला आहे. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये ३३०७ धावा केल्या आहेत. या प्रकरणात त्याने मार्टिन गप्टिलला (३२९९ धावा) मागे टाकले आहे.
एमसीएने भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांचाही सन्मान करण्याचा निर्णय घेतला आहे. असोसिएशनने सांगितले, की आयपीएल २०२२ पूर्वी एक सत्कार समारंभ आयोजित केला जाईल, ज्यामध्ये पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांचाही सन्मान केला जाईल.