कसोटी क्रिकेट या पारंपरिक प्रकाराचे माहात्म्य आजच्या ट्वेन्टी-२०, टेन-१०च्या युगातही टिकवून ठेवणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये समावेश केला जाणारा विराट कोहली कारकीर्दीतील शतकी कसोटी सामना संस्मरणीय ठरवण्यासाठी प्रयत्नशील आहे. गेल्या २७ महिन्यांची तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमधील शतकाची प्रतीक्षा तो संपवेल, अशी चाहत्यांची त्याच्याकडून अपेक्षा आहे.
शुक्रवारपासून सुरू होणारी श्रीलंकेविरुद्धची पहिली कसोटी ही रोहित शर्मासाठीसुद्धा महत्त्वाची ठरेल. कारण भारताचा ३५वा कसोटी कर्णधार म्हणून तो सूत्रे सांभाळणार आहे.
श्रेयस, विहारी यांच्यात स्पर्धा
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या अनुपस्थितीत तिसऱ्या आणि पाचव्या क्रमांकांसाठी नवी रणनीती भारताला आखावी लागणार आहे. यापैकी तिसऱ्या क्रमांकावर शुभमन गिलची दावेदारी मजबूत आहे. मात्र पाचव्या क्रमांकासाठी पदार्पणात शतक झळकावणारा धडाकेबाज फलंदाज श्रेयस अय्यर आणि अष्टपैलू हनुमा विहारी यांच्यात कडवी स्पर्धा आहे. श्रेयसचा समावेश झाल्यास तो पाचव्या क्रमांकावर आणि यष्टिरक्षक-फलंदाज ऋषभ पंत सहाव्या क्रमांकावर उतरेल.
परंतु विहारीला संधी मिळाल्यास तो सहाव्या आणि पंत पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला उतरेल. कसोटी सामन्यांत आखूड टप्प्याच्या चेंडूंचा सामना करताना श्रेयसच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत. रोहित मयांक अगरवालच्या साथीने सलामीला आणि विराट नेहमीप्रमाणे चौथ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी उतरेल.
भारतीय संघाचा कसोटी प्रवास स्वातंत्र्यापूर्वीच म्हणजे १९३२मध्ये सुरू झाला. १९७१मध्ये अजित वाडेकरच्या नेतृत्वाखाली भारताने वेस्ट इंडिज आणि इंग्लंडच्या भूमीवर ऐतिहासिक यश मिळवले. सुनील गावस्करचा १० हजार धावांचा विक्रम, कपिल देवचा ४३४ बळींचा विक्रम आणि दोनशेव्या कसोटीतील सचिन तेंडुलकरचा भावनिक निरोप हे अनेक क्षण भारतीय क्रिकेटरसिकांच्या मनात रुंजी घालतात. त्यामुळेच सचिनचे विक्रम मोडित काढण्याची क्षमता असलेल्या विराटच्या १००व्या कसोटीकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.