भारत विरुद्ध श्रीलंका दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु झाला आहे. दोन्ही संघांसाठी पहिला कसोटी सामना निर्णायक ठरणार आहे. पहिल्या सामन्यात विजय मिळवून विजयी आघाडी घेण्याचा दोन्ही संघांचा प्रयत्न असणार आहे. रोहित शर्माच्या कर्णधारपदाचा कस लागणार आहे. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. लंचपर्यंत भारताने २ गडी गमवून १०९ धावा केल्या. कर्णधार रोहित शर्मा २८ चेंडूत २९ धावा करून बाद झाला.
या खेळीत त्याने ६ चौकार मारले. लहिरू कुमाराच्या गोलंदाजीवर सुरंगा लकमलने त्याचा झेल घेतला. त्यानंतर लगेचच मयंक अग्रवाल लसिथ इम्बुलडेनियाच्या गोलंदाजीवर पायचीत होत तंबूत परतला. त्याने ४९ चेंडूत ३३ धावा केल्या. या खेळीत ५ चौकारांचा समावेश आहे. हनुमा विहारी ३० तर विराट कोहली १५ धावांवर खेळत आहेत.
नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आम्हाला धावफळकावर धावा जमवायच्या आहेत आणि तिथून खेळ पुढे न्यायचा आहे.” भारताचा कर्णधार बनणे हा एक मोठा सन्मान आहे, मी कधी स्वप्नातही पाहिले नव्हते, असंही त्याने पुढे सांगितलं. त्यानंतर विराट कोहलीच्या १०० व्या कसोटी सामन्याबद्दलही त्याने आपल्या भावना व्यक्त केल्या. आम्हाला माहित आहे की, हा एक विशेष प्रसंग आहे. कारण जास्त लोक १०० कसोटी सामने खेळत नाहीत.
भारतीय संघ- रोहित शर्मा (कर्णधार), मयंक अग्रवाल, हनुमा विहारी, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋषभ पंत, रविंद्र जडेजा, आर. अश्विन, जे. यादव, मोहम्मद शम्मी, जसप्रीत बुमराह
श्रीलंकन संघ- डिमुथ करुणारत्ने (कर्णधार), लहिरू थिरिमन्ने, पथुम निस्सांका, चरीथ असलांका, धनंजया डीसिल्वा, अँजेलो मॅथ्यू, निरोशन डिकवेल्ला, लसिथ इम्बेललडेनिया, सुरंगा लकमल, विश्वा फर्नांडो, लहिरू कुमारा