मुंबई – भारतीय संघाचे मंगळवारी मायदेशात आगमन झाले. कॅरेबियन बेटांवर विक्रमी पाचव्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे जेतेपद पटकावणाऱ्या
यश धूलच्या नेतृत्वाखालील भारतीय युवा संघाने शनिवारी अंतिम सामन्यात इंग्लंडला पराभूत करत विजयोत्सव साजरा केला. त्यानंतर भारतीय संघाला मायदेशी परतण्यासाठी दीर्घकाळ विमानप्रवास करावा लागला. त्यांनी कॅरेबियन बेटांवरून सर्वप्रथम अॅमस्टरडॅम (हॉलंड) गाठले. तेथून त्यांना दुबईला जावे लागले आणि त्यानंतर मंगळवारी सकाळी भारतीय खेळाडूंचे बेंगळूरु येथे आगमन झाले. त्यानंतर त्यांना अहमदाबाद येथे नेण्यात आले असून बुधवारी त्यांचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (बीसीसीआय) वतीने सत्कार करण्यात येणार आहे.
विश्वचषक स्पर्धांत सहभागी होणाऱ्या संघाच्या प्रवासाची व्यवस्था आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडून (आयसीसी)ICC करण्यात येते. त्यामुळे भारतीय खेळाडूंना विमानात इकॉनॉमी क्लासमध्ये बसून प्रवास करावा लागला. भारतीय युवा संघाला मार्गदर्शन करण्यासाठी वेस्ट इंडिजला गेलेला राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा (एनसीए) अध्यक्ष व्हीव्हीएस लक्ष्मणने निवडकर्ते आणि पाच राखीव खेळाडूंसह स्वतंत्रपणे प्रवास केला. दुसऱ्या साखळी सामन्यापूर्वी भारतीय संघात करोनाचा शिरकाव झाल्याने या राखीव खेळाडूंना त्वरित विंडीजला जावे लागले होते.