स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी
न्यूझीलंडविरुद्ध हॅगले ओव्हल मैदानावर झालेल्या दुसऱ्या टी-२० सामन्यात तिलक वर्माने शानदार खेळी करत भारतीय संघाला ४ गडी राखून थरारक विजय मिळवून दिला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेत २-० अशी अभेद्य आघाडी घेतली आहे. या महत्त्वपूर्ण सामन्यात ‘प्लेअर ऑफ द मॅच’ पुरस्कार पटकावल्यानंतर तिलकने आपल्या यशाचे रहस्य उलगडले असून, ‘संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास आहे’ या प्रशिक्षकांच्या कानमंत्राने त्याला प्रेरणा दिल्याचे त्याने सांगितले.
शनिवारी (२४ ऑक्टोबर) झालेल्या या सामन्यात १८१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना ११ व्या षटकात भारताची अवस्था ५ बाद ७० अशी झाली होती. न्यूझीलंडचा कर्णधार मिचेल सँटनरने फिरकीच्या जाळ्यात भारतीय फलंदाजांना अडकवत केवळ २१ धावांत ४ बळी घेतले. मात्र, त्यानंतर नमन धीर (३१ धावा) आणि तिलक यांच्यात ४२ धावांची भागीदारी झाली. १५ व्या षटकात भारताची धावसंख्या ६ बाद ११२ अशी घसरल्यानंतर तिलकने डावाची सूत्रे हाती घेतली आणि अवघ्या २६ चेंडूत नाबाद ५१ धावांची खेळी केली.
सामना हातातून निसटत असताना तिलकने नितीश कुमार रेड्डीसोबत (१३ चेंडूत नाबाद २६) अभेद्य भागीदारी रचली. या दोघांनी केवळ ३० चेंडूत ६९ धावा जोडत १ चेंडू राखून भारताला विजय मिळवून दिला. या थरारक विजयानंतर श्रेयस अय्यरनेही तिलक आणि रेड्डी यांनी दाखवलेल्या झुंजारपणाचे कौतुक केले. याचबरोबर, सलग २६ यशस्वी पाठलाग पूर्ण करत तिलक टी-२० मधील नवा ‘चेसमास्टर’ म्हणून उदयास आला आहे.
सामन्यानंतर ‘क्रिकबझ’ला दिलेल्या प्रतिक्रियेत तिलकने सांगितले की, “५ गडी बाद झाल्यानंतर मला फक्त शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहायचे होते. आजच्या सामन्यापूर्वी मी प्रशिक्षक गौतम सर आणि सितांशु कोटक सर यांच्याशी बोललो होतो. त्यांनी मला सांगितले की, ‘आपल्या सर्वांचा आणि संपूर्ण भारताचा तुझ्यावर विश्वास आहे.'”
तो पुढे म्हणाला, “तू शेवटपर्यंत राहिलास तर सामना जिंकून देशील. माझ्या डोक्यात तेच सुरू होते आणि मला सामना शक्य तितका पुढे न्यायचा होता. सरतेशेवटी, सर्वांचा जो विश्वास होता तेच मी करून दाखवले.”
खेळपट्टी संथ असल्याचे सांगत तिलक म्हणाला, “दुर्दैवाने नमन बाद झाला, अन्यथा आम्ही १९ व्या षटकातच सामना संपवला असता. त्यानंतर आम्ही दोघे हैदराबादी खेळाडू (नितीश आणि तिलक) एकत्र होतो. सकारात्मक दृष्टिकोन दाखवत मोकळ्या जागेत चेंडू मारून वेगाने धावा काढण्याची आमची योजना होती. आम्ही ८-१० महत्त्वपूर्ण धावा पळून काढल्या. जलदगती गोलंदाजांना आम्ही चौकार मारू शकतो आणि मोकळ्या जागेचा वापर करू शकतो, हे आम्हाला माहीत होते.”
या सामन्यात फलंदाजीसोबतच क्षेत्ररक्षणातही तिलकने नवा जागतिक विक्रम प्रस्थापित केला आहे. पहिल्या तीन षटकांत दोन महत्त्वाचे झेल घेत तिलकने २०२६ या एकाच कॅलेंडर वर्षात टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २६ झेल पूर्ण केले. यापूर्वी २०२५ मध्ये २५ झेल घेणाऱ्या इंडोनेशियाच्या डॅनिल्सन हावोएला मागे टाकत टी-२० मध्ये एका वर्षात सर्वाधिक झेल घेण्याचा विश्वविक्रम त्याने आपल्या नावावर केला आहे.
📌 महत्वाच्या बातम्या
- एन्ड्युरन्स-एमएसएलटीए-एआयटीए क्ले कोर्ट नॅशनल १४ वर्षांखालील ज्युनियर टेनिस चॅम्पियनशिप: रिवान परमारची दुसऱ्या फेरीत धडक
- शालेय क्रीडा स्पर्धा खेळाडू आणि शारीरिक शिक्षकांसाठी शिक्षा? क्रीडा विभागाच्या कारभारावर तीव्र संताप
- क्रिकेट सामना सुरू असताना मैदानात माकडाची एन्ट्री; महिला खेळाडूवर हल्ला, व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल











