औरंगाबाद : क्रीडा विश्वातील घटना-घडामोडी वाहिलेल्या स्पोर्ट्स पॅनोरमा, या माध्यमाच्या लोगोचे अनावरण करण्यात आले. हा कार्यक्रम राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त दिनांक 29 ऑगस्ट रोजी औरंगाबाद शहरात आयोजित करण्यात आला. क्रीडा विश्वासाठी हक्काचं व्यासपीठ असलेलं हे माध्यम मासिक, वेब पोर्टल आणि चॅनलच्या रूपात वाचकांच्या भेटीला येत आहे.
स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोचे अनावरण कार्यक्रमास औरंगाबाद ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष पंकज भारसाकळे,प्रा.श्याम तळेगावकर, क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे, औरंगाबाद स्क्वॅश संघटना अध्यक्ष प्रदीप खांडरे, स्पोर्ट्स पॅनोरमाचे संपादक प्रवीण वाघ, एआयएन न्यूजचे संपादक संतोष आदमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. त्यांनी प्रारंभी हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
त्यानंतर या मान्यवरांनी स्पोर्ट्स पॅनोरमा माध्यमाच्या लोगोसह, संकेतस्थळाचे अनावरण केले. याप्रसंगी पंकज भारसाखळे म्हणाले की, क्रीडा विश्वातील चालू घडामोडीसह खेळातील समस्या मांडण्यासाठीतसेच त्या समोर आणण्यासाठी स्वतंत्र माध्यमाची आवश्यकता होती. ती उणीव स्पोर्ट्स पॅनोरमा, या माध्यमाने भरून काढली. खेळाचा विकास होतोय.या विकासाला चालना देण्याचे काम स्पोर्ट्स पॅनोरमा करेल, असा विश्वास यांनी जागवला. क्रीडा अधिकारी चंद्रशेखर घुगे म्हणाले की, हे माध्यम शासनाचे क्रीडा धोरण खेळाडूंसह लोकांपर्यंत नेण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. खेळासाठी शासनाने आणलेल्या योजना आता जलद गतीने या माध्यमातून लोकांपर्यंत जातील. म्हणून क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे या माध्यमाचे स्वागतच आहे, असे श्री. घुगे म्हणाले. या प्रसंगी एंजल किड्स इंटरनॅशनल स्कूल संचालक तुकाराम मुंडे व विविध मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संपादकीय मंडळातील भास्कर लांडे यांनी केले. या कार्यक्रमास सर्व क्रीडा शिक्षक, प्रशिक्षक,खेळाडू व संघटनांच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.