म्युलहाइम – दुहेरी ऑलिम्पिक पदकविजेती पी. व्ही. सिंधू आणि जागतिक अजिंक्यपद स्पर्धेतील रौप्यपदक विजेता किदाम्बी श्रीकांत या आघाडीच्या भारतीय खेळाडूंनी जर्मन खुल्या बॅडिमटन स्पर्धेत (सुपर ३०० दर्जा) विजयी सलामी दिली.
सातव्या मानांकित सिंधूने मंगळवारी महिला एकेरीच्या पहिल्या फेरीत थायलंडच्या बुसानन ओंगबमरुंगपानला २१-८, २१-७ असे सरळ गेममध्ये पराभूत केले. जागतिक क्रमवारीत ११व्या स्थानी असलेल्या बुसाननवरील सिंधूचा हा १५वा विजय ठरला. तिचा पुढील फेरीत स्पेनची बिएट्रीझ कोरालेस आणि चीनच्या झांग यी मान यांच्यातील विजेतीशी सामना होईल.
प्रतीक-सिक्की रेड्डी गारद
मिश्र दुहेरीत साई प्रतीक आणि एन. सिक्की रेड्डी या जोडीचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. देचापोल आणि सापसिरे या थायलंडच्या अव्वल मानांकित जोडीने त्यांना २१-१९, २१-८ असे नमवले. महिला दुहेरीत हरिता हरिनारायण आणि अशाना रॉय यांनाही पहिल्या फेरीत पराभव पत्करावा लागला. इटलीच्या मार्टीना कोर्सिनी आणि जुदिथ मेर जोडीने त्यांच्यावर २१-९, २१-१० अशी मात केली.
पुरुष एकेरीच्या पहिल्या फेरीत आठव्या मानांकित श्रीकांतने फ्रान्सच्या ब्राइस लेव्हेर्डेझवर २१-१०, १३-२१, २१-७ अशी मात केली. श्रीकांतचा हा लेव्हेर्डेझवरील सलग चौथा विजय ठरला. दुसऱ्या फेरीत श्रीकांत चीनच्या लू गुआंग झू याच्याविरुद्ध खेळेल.