औरंगाबाद (प्रतिनिधी):औरंगाबादच्या भारतीय क्रीडा प्राधिकारणाची (साई) खेळाडू सृष्टी साठेने जबरदस्त कामगिरी करत जॉर्डन येथे झालेल्या आशियाई ज्युनिअर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक आपल्या खात्यात जमा केले. त्याचबरोबर औरंगाबादचा युवा बॉक्सर गौरव म्हस्केने कांस्यपदक जिंकून मराठवाड्याचा पहिला पदक विजेता पुरूष खेळाडू बनण्याचा बहुमान पटकावला. यापूर्वी शर्वरी कल्याणकर व देविका घोरपडेने पदके जिंकली आहेत.
मुलींच्या ६३ किलो वजन गटात सृष्टीने अंतिम लढतीत कझाकिस्तानच्या खेळाडूला दुसऱ्याच फेरीत नाॅकऑऊट केले. तिने जबरदस्त सलग पंच देत विरोधी खेळाडूला गुण घेण्याची संधी दिली नाही आणि सामन्या ५-० गुणांनी एकतर्फी विजय मिळवत सुवर्ण जिंकले. दोन्ही विजेत्या खेळाडूंचे साईचे उपसंचालक नितीन जैस्वाल, शहर बॉक्सिंग संघटनेचे सचिव पंकज भारसाखळे, प्रशिक्षक सन्नी गेहलोत यांनी अभिनंदन केले आहे.
– गौरवची गौरवास्पद कामगिरी :
जिल्ह्यातील उदोन्मुख खेळाडू गौरव म्हस्केने कांस्यपदक जिंकून औरंगाबादच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. मुलांच्या ८०+ वजन गटाच्या उपांत्य सामन्यात त्याला कझाकिस्तानच्या खेळाडूकडून पराभवाचा सामना करावा लागला. त्याने स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत तिसरा क्रमांक पटकावला. सर्व साधारण कुटुंबातील हा खेळाडू आहे. तो विभागीय क्रीडा संकुलातील टाकस् बॉक्सिंग अकादमीमध्ये नियमित सराव करतो. त्याला प्रशिक्षक राहुल टाक यांचे मार्गदर्शन लाभत आहे.