खेलो इंडिया युथ गेम्स2021; महाराष्ट्राची हरियानात सुवर्ण-रौप्य लूट पाचव्या दिवशी चौदा पदके पटकावली.

पंचकुला (प्रतिनिधी): हरियानात खेलो इंडियात महाराष्ट्राच्या खेळाडूंची सुवर्ण आणि रौप्य पदकांची कमाई सुरूच आहे. पाचव्या दिवशी सहा सुवर्ण, सहा रौप्य आणि दोन कांस्य पदके खेळाडूंनी पटकावली. त्यात बॅडमिंटन, कुस्ती, अॅथलेटिक्स, कब्बडी, सायकलिंग आदी क्रीडाप्रकारांचा समावेश आहे.
ताऊ देवीलाल स्टेडियममध्ये पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राने आपला वरचष्मा कायम ठेवला आहे. बॅडमिंटनमध्ये दर्शन पुजारीने त्याचा पारंपरिक प्रतिस्पर्धी तामीळनाडूच्या ऋत्विक संजीवला दोन गेममध्ये हरवले. कब्बडीत मुलांच्या संघाला सुवर्णपदकाने थोडक्यात हुलकावणी दिली. त्यांचा हरियानाकडून १९ गुणांनी पराभव झाला. मुलांच्या संघाला कांस्यपदक मिळाले.
ट्रॅक सायकलिंगमध्ये केरीन प्रकारात मंगेश ताकमोगेने व मुलींमध्ये पूजा दानोळेने याच प्रकारात रौप्य पदके पटकावली.अॅथलेटिक्समध्ये उंच उडीत – अनिकेत माने (२.०७ मी., हरोली, कोल्हापूर) याने सुवर्ण पदक पटकावले. तर आर्यन पाटीलने (उत्तेखोल, रायगड) याच प्रकारात (२.०४मी.) रौप्य जिंकले. सातारच्या सुदेष्णा शिवणकरने १०० मीटर धावण्यात सुवर्ण कमाई केली. मुलींमध्ये याच प्रकारात वडगाव शेच्या (पुणे) अवंतिका नरळेने रौप्य पदकावर नाव कोरले.
४ बाय १०० मी.रिलेमध्ये दिग्विजय चौघुले, सार्थक शेलार, आर्यन कदम व आकाश सिंग यांच्या संघानेही सुवर्ण पदक पटकावले.कुस्तीत ५१ किलो फ्री स्टाईल – नरसिंग पाटील (सुवर्ण, कोल्हापूर), रोहित पाटील (रौप्य, कोल्हापूर). या दोघांचीच शेवटची कुस्ती झाली. परिणामी एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळाले.
मुलींमध्ये ४९ किलो गटात अहिल्या शिंदेने कांस्य पदक जिंकले. ६५ किलो फ्रीस्टाईलमध्ये कोल्हापूरच्याच शुभम पाटीलने सुवर्ण पदक उंचावले. ७१ किलो गटात संकेत पाटीलने (कोल्हापूर) कांस्यची कमाई केली. एकंदरीत महाराष्ट्राच्या पैलवानांनी हरियानातील खेलो इंडियाचा आखाडा गाजवला.
क्रीडा आयुक्तांकडून अभिनंदन
क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी खेळाडूंना तसेच प्रशिक्षकांना फोन करून पदकासाठी शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राचा संघ हरियानात दाखल झाल्यापासून ते त्यांच्या निवास आणि भोजन व इतर बाबींचा आढावा घेत आहेत. पदकापर्यंत पोचलेल्या खेळाडूंना फोन करून मनोबल वाढवित आहेत. पदकविजेत्यांचे अभिनंदनही करीत आहेत.
Comments are closed.