IPL2022: महाराष्ट्राबाहेर रंगणार फायनल..!

मुंबई | आयपीएल २०२२चे लीग स्टेजचे सामने सध्या मुंबई आणि पुणे, महाराष्ट्रात खेळले जात आहेत. लीग स्टेजनंतर प्लेऑफचे सामने खेळवले जातील. लीगच्या १५व्या हंगामातील प्लेऑफ सामने कोलकात्याच्या इडन गार्डन्सवर होणार असल्याचे मानले जात आहे. वृत्तानुसार, क्वालिफायर १ आणि एलिमिनेटर सामने कोलकात्यात तर क्वालिफायर २ आणि अंतिम सामना अहमदाबादमध्ये होणार आहे. याबाबत बोर्ड लवकरच अधिकृत घोषणा करू शकते.

येत्या काही दिवसांत आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलची बैठक होणार आहे आणि त्यानंतर अधिकृत घोषणा केली जाईल. लखनऊच्या नवीन स्टेडियममध्ये प्लेऑफ सामना आयोजित करण्याचा प्रस्ताव असल्याचेही अहवालात म्हटले आहे. यूपी क्रिकेट असोसिएशनने बीसीसीआय आणि आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलला लखनऊच्या एकना स्टेडियमवर पात्रता फेरीचे आयोजन करण्याची औपचारिक विनंती केली आहे. मात्र, गव्हर्निंग काऊन्सिल हा प्रस्ताव मान्य करेल अशी शक्यता नाही.

दोन वर्षांनी भारतात आयपीएलचे आयोजन होत आहे. १५व्या हंगामातील लीग टप्प्यातील सामने सध्या मुंबईतील वानखेडे स्टेडियम, डीवाय पाटील स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियम आणि पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळले जात आहेत. यावेळी प्रेक्षकांनाही स्टेडियममध्ये प्रवेश देण्यात आला आहे.

You might also like

Comments are closed.