मुंबई | ब्रेबॉर्न स्टेडियमवर चाहत्यांना आयपीएल २०२२चा रोमहर्षक सामना पाहायला मिळाला. चौकार-षटकारांची आतषबाजी झालेल्या या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्सला ४४ धावांनी पराभूत केले. या सामन्यात कोलकाताचा कॅप्टन श्रेयस अय्यरने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी घेतली, पण हा निर्णय त्याच्या अंगउलट आला. सलामीवीर शॉ, वॉर्नर यांची अर्धशतके आणि शेवटी शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल यांनी केलेल्या फटकेबाजीमुळे दिल्लीने कोलकाताला २१६ धावांचे आव्हान दिले. प्रत्युत्तरात कोलकाताचा संघ १९.४ षटकात १७१ धावांपर्यंतच पोहोचू शकला. दिल्लीकडून फिरकीपटू कुलदीप यादवने ३५ धावांत ४ बळी घेत सामना दिल्लीच्या बाजूने झुकवला.
कोलकाताचा डाव
दिल्लीच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना कोलकाताची सुरुवात खराब झाली. दिल्लीचा वेगवान गोलंदाज खलील अहमदने प्रथम व्यंकटेश अय्यर (१८) त्यानंतर अजिंक्य रहाणे (८) या सलामीवीरांना तंबूत पाठवले. त्यानंतर कप्तान श्रेयस अय्यरने नितीश राणासोबत झुंज दिली. श्रेयसने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५४ धावांची अर्धशतकी खेळी करत संघाला शतकी टप्पा ओलांडून दिला. राणानेही आक्रमक ३० धावांची खेळी केली. दिल्लीचा फिरकीपटू कुलदीप यादवने सामना दिल्लीच्या बाजूने फिरवला, त्याने श्रेयसला फसवले. १६व्या षटकात त्याने पॅट कमिन्स, सुनील नरिन आणि उमेश यादव यांना पॅव्हेलियनला मार्ग दाखवला. आंद्रे रसेलने फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला, पण दिल्लीचे आव्हान त्याला पेलवले नाही. रसेल २४ धावा काढून बाद झाला. १९.४ षटकात कोलकाताला सर्वबाद १७१ धावा करता आल्या.
दिल्लीचा डाव
मागच्या सामन्यात अपयशी ठरलेल्या डेव्हिड वॉर्नरने आज पृथ्वी शॉसोबत दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी नवव्या षटकातच ९३ धावा केल्या. पृथ्वीने सलग दुसरे अर्धशतक ठोकले. त्याने ७ चौकार आणि २ षटकारांसह ५१ धावा केल्या. फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला बाद करत कोलकाताला पहिले यश मिळवून दिले. त्यानंतर कप्तान ऋषभ पंतने वॉर्नरला साथ दिली. वॉर्नरने ६ चौकार आणि २ षटकारांसह ६१ धावा ठोकल्या. १७व्या षटकात वॉर्नर माघारी परतला. शेवटच्या दोन षटकात शार्दुल ठाकूर आणि अक्षर पटेल यांनी आतषबाजी फटके खेळले. त्यांच्यामुळे दिल्लीला दोनशेपार जाता आले. २० षटकात दिल्लीने ५ बाद २१५ धावा केल्या. शार्दुलने ११ चेंडूत १ चौकार आणि ३ षटकारांसह नाबाद २९ तर अक्षरने २ चौकार आणि एका षटकारासह नाबाद २२ धावा केल्या.
Need we say anything? 💙❤️#YehHaiNayiDilli | #IPL2022 | #KKRvDC #TATAIPL | #IPL | #DelhiCapitals pic.twitter.com/7CpqBa8lNk
— Delhi Capitals (@DelhiCapitals) April 10, 2022