मुंबई | शेवटच्या क्षणापर्यंत रंगलेल्या आयपीएल २०२२मधील सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्सचा ३ धावांनी पराभव केला. नाणेफक गमावलेल्या संजू सॅमसनच्या राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १६५ धावा केल्या. स्फोटक खेळाडू शिमरॉ़न हेटमायरने नाबाद ५९ धावांची खेळी केली. प्रत्युत्तरात लखनऊची आघाडीची आणि मधली फळी ढेपाळली. शेवटच्या काही षटकात मार्कस स्टॉइनिसने आकर्षक फटकेबाजी केली, पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. या विजयासह राजस्थानने गुणतालिकेत पहिले स्थान मिळवले.
लखनऊची झुंज अपयशी
राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टने पहिल्याच चेंडूवर कप्तान केएल राहुलचा त्रिफळा उडवत लखनऊला चांगली सुरुवात करू दिली नाही. दुसऱ्याच चेंडूवर बोल्टने कृष्णप्पा गौतमला पायचीत पकडले. त्यानंतर प्रसिध कृष्णाने जेसन होल्डरला झेलबाद केले. २५ धावांची खेळी केलेला दीपक हुडा कुलदीप सेनचा बळी ठरला. ७४ धावांत लखनऊने आपले पाच फलंदाज गमावले. यानंतरही लखनऊचे फलंदाज ठराविक अंतराने बाद होत राहिले. आजच लखनऊसाठी पहिला सामना खेळणाऱ्या मार्क स्टॉइनिसने फटकेबाजी करत सामन्याला शेवटच्या षटकापर्यंत नेले. ६ चेंड़ूत १५ धावांची गरज असताना स्टॉइनिस युवा गोलंदाज कुलदीप सेनला मोठे फटके खेळण्यात अपयशी ठरला. या षटकात लखनऊला ११ धावा घेता आल्या. स्टॉइनिसने २ चौकार आणि ४ षटकारांसह नाबाद ३८ धावांची खेळी केली. २० षटकात लखनऊला ८ बाद १६२ धावा करता आल्या. राजस्थानकडून युझवेंद्र चहलने ४१ धावांत ४ बळी घेतले.
राजस्थानचा डाव
यंदा भन्नाट फॉर्मात खेळणाऱ्या जोस बटलरला आज लखनऊविरुद्ध चांगली सुरुवात करता आली नाही. वेगवान गोलंदाज आवेश खानने बटलरचा (१३) सुंदर त्रिफळा उडवला. दहाव्या षटकात कृष्णप्पा गौतमने संयमी खेळणारा देवदत्त पडिक्कल (२९) आणि रॅसी व्हॅन डर ड्युसेन (४) यांना बाद केले. त्यानंतर शिमरॉन हेटमायर आणि रवीचंद्रन अश्विनने फटकेबाजी केली. हेटमायरने अर्धशतक ठोकत संघाला दीडशेपार पोहोचवले. हेटमायरने १ चौकार आणि ६ षटकारांसह नाबाद ५९ धावा केल्या. २० षटकात राजस्थानने ६ बाद १६५ धावा केल्या. लखनऊकडून जेसन होल्डर आणि कृष्णप्पा गौतम यांनी २-२ बळी घेतले.
WHAT. A. GAME! 👌 👌@rajasthanroyals return to winning ways after edging out #LSG by 3 runs in a last-over finish. 👏 👏
Scorecard 👉 https://t.co/8itDSZ2mu7#TATAIPL | #RRvLSG pic.twitter.com/HzfwnDevS9
— IndianPremierLeague (@IPL) April 10, 2022