मुंबई | आयपीएल २०२२मध्ये क्रिकेटरसिकांना ब्रेबॉर्न स्टेडियमवर चौकार-षटकारांची आतषबाजी पाहायला मिळाली. लखनऊ सुपर जायंट्सने बलाढ्य चेन्नई सुपर किंग्जला ६ गडी राखून पराभव करत आयपीएलमध्ये आपला पहिला विजय नोंदवला. लखनऊने चेन्नईच्या २११ धावांचा यशस्वी पाठलाग करत आपली फलंदाजी सिद्ध केली. नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ७ बाद २१० धावा केल्या. रॉबिन उथप्पा आणि शिवम दुबे यांनी अप्रतिम फलंदाजी करत लखनऊला सळो की पळो करून सोडले. मात्र लखनऊने चोख प्रत्युत्तर देत ३ चेंडू शिल्लक ठेवत विजयावर शिक्कामोर्तब केले. लखनऊकडून दमदार ५५ धावा ठोकणाऱ्या एविन लुईसला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
लखनऊचा डाव
कप्तान केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी लखनऊला चांगली सुरुवात करून दिली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ९९ धावा फलकावर लावत चेन्नईच्या गोलंदाजांची पिसे काढली. चेन्नईचा वेगवान गोलंदाज ड्वेन प्रिटोरियसने राहुलला अंबाती रायुडूकरवी झेलबाद करत लखनऊला पहिला धक्का दिला. राहुलने २ चौकार आणि ३ षटकारांसह ४० धावा केल्या. क्विंटनने हाणामारी सुरू ठेवत अर्धशतक ठोकले. त्याने ९ चौकारांसह ६१ धावांची खेळी केली. त्यानंतर लखनऊच्या एविन लुर्ईसने मोर्चा सांभाळला. लुईसने सीएसकेची दाणादाण उडवत अर्धशतक ठोकले. त्याने २३ चेंडूत ६ चौकार आणि ३ षटकार ठोकत नाबाद ५५ धावांची विजयी खेळी केली. लखनऊने ३ चेंडू आणि ६ गडी राखून चेन्नईच्या विशाल आव्हानाचा पाठलाग केला.
चेन्नईचा डाव
रॉबिन उथप्पा (५०) आणि शिवम दुबे (४९) यांच्या शानदार खेळीमुळे चेन्नई सुपर किंग्जने लखनऊ सुपर जायंट्ससमोर २० षटकात ७ गडी गमावून २१० धावा केल्या. अंबाती रायडू आणि दुबे यांनी संघासाठी ३७ चेंडूत सर्वाधिक ६० धावांची भागीदारी केली. सलामीवीर रॉबिन उथप्पाने सुरुवातीपासूनच वेगवान फटकेबाजी केली. तिसऱ्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर रवी बिश्नोईने ऋतुराज गायकवाडला (१) बाद केले. पण उथप्पा आणि मोईन अली यांनी वेगाने धावा केल्या, कारण सीएसकेने पॉवरप्लेमध्ये एक गडी गमावून ७३ धावा जोडल्या. उथप्पाने ८ चौकार आणि एका षटकारासह ५० धावा केल्या बिश्नोईने त्याला बाद केले. मोईन अलीने ४ चौकार आणि २ षटकारांसह ३५ धावा जोडल्या. त्यानंतर शिवम दुबेने फटकेबाजी केली. त्याने आपल्या खेळीत ५ चौकार आणि २ षटकार जोडले. मागील सामन्यात अर्धशतक ठोकलेल्या महेंद्रसिंह धोनीने फिनीशरची भूमिका सार्थ करत ६ चेंडूत २ चौकार आणि एक षटकार ठोकत संघाला दोनशेपार पोहोचवले. लखनऊकडून रवी बिश्नोई, अँड्र्यू टाय आणि आवेश खान यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.