नागपूर : नागपूर शहराबाहेर नागपूर सुधार प्रन्यास व अन्य शासकीय संस्थांच्या अधिपत्याखाली असणाऱ्या जमिनीवर बेकायदा लेआउट टाकून गरीब नागरिकांची फसवणूक करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश पशुसंवर्धन, दुग्धविकास क्रीडा व युवक कल्याण मंत्री सुनील केदार यांनी दिले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आज या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीला जिल्हाधिकारी विमला आर., महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी., नागपूर सुधार प्रन्यासचे सभापती मनोज सुर्यवंशी, अतिरिक्त्ा आयुक्त अविनाश कातडे, निवासी उपजिल्हाधिकारी जगदीश कातकर यासंदर्भात कार्य करणाऱ्या जिल्हा परिषद सदस्य प्राध्यापक अवांतिका लेकुरवाळे आदींसह संबंधित विभागाचे विभाग प्रमुख व फसवणूक झालेले प्लॉट धारक देखील उपस्थित होते.
यावेळी पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार यांनी कोणत्याही परिस्थितीत गरीब व अन्यायग्रस्त नागरिकांचे नुकसान होणार नाही, याबद्दल आश्वस्त केले. या संदर्भात तोडगा काढण्याचे निर्देश त्यांनी यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना दिले. सोबतच यानंतर कोणतेही अतिक्रमण या भागात होऊ नये, यासाठी नियमित प्रयत्न संबंधित संस्थांनी करावे, असेही त्यांनी सांगितले.
महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नागपूर महानगरपालिकाद्वारा राष्ट्रीय क्रीडा केंद्र व प्रशिक्षण संस्थेला ही जागा देण्यात आली असून या जागेच्या ठिकाणी संरक्षण भिंत बांधण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. तथापि, यासंदर्भात पुढील आठ दिवसात महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जातील, त्यानंतरच संरक्षण भिंतीचे काम सुरू करा, असे श्री केदार यांनी यावेळी जाहीर केले.बैठकीमध्ये अवंतिका लेकुरवाळे यांनी या भागातील रहिवाशांच्या समस्यांची मांडणी केली. तरोडी येथील खसारा क्रमांक 52 ते 60,खसारा क्रमांक 16/1, 16/2 तसेच खसारा क्रमांक 15 बाबत निर्णय घेताना या ठिकाणाच्या रहिवाशांना त्यांच्या आयुष्यभराच्या कमाईचा मोबदला मिळावा, योग्य पुनर्वसन व्हावे, लाभार्थ्यांना मालकी हक्काचे पट्टे वाटप करावे, बांधकाम नियमित करावे, विरळ क्षेत्रात असणाऱ्यांचे प्रथम पुनर्वसन करावे, मालकी हक्काचे भूखंड असणारे परंतु रहिवासी नसनाऱ्यांबद्दल निश्चित निर्णय घ्यावा, तोपर्यंत क्रीडा संकुल बांधकामास तात्पुरती स्थगिती द्यावी, अशी मागणी केली.
तथापि, क्रीडा संकुलाच्या परिसरात असणाऱ्या पक्क्या बांधकामाचे पुनर्वसन निश्चित होईल, असे मंत्री श्री. केदार यांनी सांगितले. मात्र यापुढे या परिसरात कोणतेही अतिक्रमण होणार नाही, याची काळजी घेण्याचे निर्देश त्यांनी महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या अधिकाऱ्यांना दिले.
यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना श्री केदार यांनी नागपूर शहराच्या लगतच्या शासकीय जागांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होत आहे. त्यामुळे आपापल्या मालमत्ते संदर्भातील अधिकृत दस्तावेज तसेच वारंवार त्यासंदर्भातील नोंदी तपासणे मोका तपासणी करणे व या ठिकाणी अनधिकृत बांधकामे उभारणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचे निर्देश दिले यासंदर्भातील एक मोहीम महानगरपालिका व नागपूर सुधार प्रन्यासच्या वतीने राबवण्याचेही त्यांनी सांगितले