हरियाणाचा युपीवर एका गुणाने विजय

प्रो कबड्डी लीगच्या आठव्या हंगामात रविवारी (२३ जानेवारी) पहिल्या सामन्यात युपी योद्धा व हरियाणा स्टीलर्स आमनेसामने आले. अव्वल खेळाडूंनी भरलेल्या या सामन्यात पूर्ण वेळेनंतर हरियाणा संघाने विजय संपादन करत गुणतालिकेत पाचवे स्थान पटकावले.

सामन्याच्या सुरुवातीला दोन्ही संघांनी काहीसा संथ खेळ केला. दोन्ही संघ एकमेकाच्या ताकदीचा अंदाज घेत होते. हरियाणासाठी डिफेन्स चांगली कामगिरी करताना दिसला. तर, यूपीसाठी परदीप नरवाल व श्रीकांत जाधव या रेडर्सनी अनुक्रमे ५ व ३ गुण मिळवले. पहिला हाफ संपला तेव्हा हरियाणा १५-१४ असा आघाडीवर होता.

पहिल्या हाफमध्ये शांत असलेला हरियाणा संघाचा कर्णधार विकास कंडोला दुसऱ्या हाफमध्ये आक्रमक दिसला. त्याने दुसऱ्या हाताच्या सुरुवातीला यूपी संघाला ऑल आउट करत ५ गुणांची आघाडी संघाला मिळवून दिली. अष्टपैलू रोहित गुलिया याने त्याला साथ दिली. डिफेन्समध्ये सुरेंदर नाडा व मोहित ही जोडी कमाल करत होती.

यूपी संघासाठी परदीप व श्रीकांत यांनी आघाडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हरियाणाने संयम दाखवत आपली आघाडी टिकवून ठेवली. सामना संपण्यास एक मिनिट व काही सेकंद शिल्लक असताना श्रीकांतने सुपर रेड मारत सामना बरोबरीत आणला. मात्र, अखेरचा रेडमध्ये विनयने बोनस गुण मिळवत हरियाणाला ३६-३५ असा विजय मिळवून दिला.

You might also like

Comments are closed.