स्पोर्ट्स पॅनोरमा | विशेष प्रतिनिधी | मुंबई
मल्लखांब क्षेत्रात राष्ट्रीय स्तरावर मोठे नाव आणि केंद्र सरकारचा प्रतिष्ठेचा द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त प्रशिक्षक गणेश प्रभाकर देवरूखकर यांच्याविरोधात अल्पवयीन विद्यार्थिनीने केलेल्या गंभीर आरोपांनंतर मुंबईतील विलेपार्ले पोलीस ठाण्यात POCSO कायद्यासह भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उपलब्ध FIRनुसार, FIR क्रमांक 873/2026 हा 21 ऑगस्ट 2026 रोजी विलेपार्ले पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आला. त्यामध्ये भारतीय न्याय संहिता (BNS), 2023 चे कलम 75 तसेच Protection of Children from Sexual Offences (POCSO) Act, 2012 मधील कलम 8 आणि 12 नोंदविण्यात आली आहेत.
गणेश देवरूखकर यांना मल्लखांबमधील उल्लेखनीय प्रशिक्षण कार्यासाठी 2023 चा द्रोणाचार्य पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार देण्यात आल्याची नोंद राष्ट्रपती भवनाच्या अधिकृत माहितीत आहे.
मुंबई उपनगर जिल्हा मल्लखांब संघटनेच्या माहितीनुसार देवरूखकर हे द्रोणाचार्य पुरस्कार 2023, शिवछत्रपती पुरस्कार, आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंच तसेच पुरुष व महिला विश्वविजेत्या खेळाडूंचे प्रशिक्षक म्हणून कार्यरत राहिले आहेत. श्री पार्लेश्वर व्यायामशाळेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून त्यांना 23 वर्षांपेक्षा अधिक प्रशिक्षणाचा अनुभव असल्याचे संघटनेच्या संकेतस्थळावर नमूद आहे.
21 ऑगस्टला नेमके काय घडल्याचा आरोप?
FIRमध्ये नोंदविलेल्या विद्यार्थिनीच्या जबाबानुसार, ती अकरावीमध्ये शिक्षण घेत असून गेल्या अनेक वर्षांपासून जिम्नॅस्टिकचे प्रशिक्षण घेत आहे. संबंधित प्रशिक्षकाकडेही ती प्रशिक्षणासाठी जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
21 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी सुमारे 10.30 वाजता प्रशिक्षकाकडून व्हॉट्सअॅपवर संदेश आल्याचा दावा विद्यार्थिनीने केला आहे. त्यानंतर सकाळी सुमारे 11 वाजता ती विलेपार्ले पूर्व येथील प्रशिक्षणस्थळी पोहोचल्याचे FIRमधील जबाबात म्हटले आहे.
तेथे कॉलेजच्या वेळेबाबत आणि कोणती शाखा निवडली याबाबत चर्चा झाल्याचे विद्यार्थिनीने म्हटले आहे.
यानंतर विद्यार्थिनी बाहेर जात असताना प्रशिक्षकाने तिचा हात पकडून तिला थांबविल्याचा आणि तिच्याशी कथित स्वरूपात गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप FIRमध्ये नोंदविण्यात आला आहे. विद्यार्थिनीने त्याला विरोध केला आणि तेथून निघून गेल्याचे तिच्या जबाबात म्हटले आहे.
मैत्रिणीपासून आईपर्यंत पोहोचली माहिती
FIRमधील कथनानुसार, कथित प्रकारामुळे विद्यार्थिनी घाबरली होती. तिने सर्वप्रथम आपल्या एका मैत्रिणीला याबाबत माहिती दिली. त्यानंतर कॉलेजमधील संबंधित व्यक्तींना ही बाब समजली आणि अखेर विद्यार्थिनीच्या आईला घटनेची माहिती देण्यात आली.
यानंतर विद्यार्थिनी कुटुंबीयांसह विलेपार्ले पोलीस ठाण्यात गेली आणि तक्रार दाखल करण्यात आली.
BNS कलम 75; POCSO कलम 8 आणि 12
FIRमध्ये नोंद असलेल्या माहितीनुसार देवरेखकर यांच्याविरोधात तीन प्रमुख कायदेशीर तरतुदी लावण्यात आल्या आहेत:
- भारतीय न्याय संहिता, 2023 — कलम 75
- POCSO Act, 2012 — कलम 8
- POCSO Act, 2012 — कलम 12
FIRमध्ये कथित घटनेची वेळ 21 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते 11.20 अशी नोंदविण्यात आली आहे.
प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश भारत माने यांच्याकडे देण्यात आल्याचे FIRमध्ये नमूद आहे.
द्रोणाचार्य पुरस्कारामुळे प्रकरणाकडे क्रीडा क्षेत्राचे लक्ष
हे प्रकरण सामान्य प्रशिक्षकाशी संबंधित नसून राष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित द्रोणाचार्य पुरस्कारप्राप्त प्रशिक्षकाशी संबंधित असल्याने मल्लखांब आणि क्रीडा क्षेत्रात त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे.
पार्ले टिळक विद्यालय असोसिएशननेही आपल्या 2024 मधील नोंदीत गणेश देवरेखकर यांचा उल्लेख “द्रोणाचार्य पुरस्कार विजेते मल्लखांब खेळाडू आणि प्रशिक्षक” असा केला आहे.
मुंबई उपनगर मल्लखांब संघटनेनुसार त्यांच्या मार्गदर्शनाखाली पुरुष आणि महिला गटातील विश्वविजेते तयार झाले आहेत. ते राष्ट्रीय व अखिल भारतीय आंतरविद्यापीठ पदकविजेते आणि आंतरराष्ट्रीय मल्लखांब पंचही आहेत.
त्यामुळे राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त प्रशिक्षकाविरोधात POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाल्याची बाब क्रीडा क्षेत्रासाठी गंभीर ठरली आहे.
राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कारप्राप्त प्रशिक्षकाविरोधात दाखल झालेल्या या प्रकरणाचा तपास आता कोणत्या दिशेने जातो आणि पोलिसांच्या तपासातून नेमके काय समोर येते, याकडे मल्लखांब आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्राचे लक्ष राहणार आहे.




