आशिया – भारताच्या महिला संघाने आशिया सांघिक अजिंक्यपद बॅडिमटन स्पर्धेच्या पहिल्याच लढतीत बुधवारी यजमान मलेशियाकडून २-३ अशा फरकाने पराभव पत्करला.
अश्मिता चलिहा आणि तारा शाह यांनी एकेरीत दिमाखदार विजय संपादन केले; परंतु दोन अननुभवी दुहेरीच्या जोडय़ांना आपली छाप पाडता आली नाही. दुखापतीमुळे अखेरच्या क्षणी मालविका बनसोडने माघार घेतल्यामुळे तिच्या जागी आकर्षी कश्यपला संधी मिळाली; परंतु किसोना सेव्हादुरायकडून १६-२१, २१-१८, १६-२१ असा तिने पराभव पत्करला.
व्हॅलेरी सिओ आणि पर्ली टॅन जोडीने खुशी गुप्ता आणि मेहरीन रिझा जोडीला २१-१, २१-६ असे नामोहरम केल्याने मलेशियाला २-० अशी आघाडी मिळाली. अश्मिताने सिटी नुरशुहैनीला २१-११, २१-१९ असे नमवले. मग अॅना शिंग यिक शेआँग आणि तेओ मेई शिंग जोडीने अरुल बोला राधाकृष्णन आणि निला व्हॅलूवान जोडीला २१-१०, २१-१२ असे हरवून ३-१ अशी आश्वासक आघाडी मिळवली. अखेरच्या लढतीत ताराने माइशा खैरूलवर २१-१६, २१-१५ असा विजय मिळवला. आता भारतीय महिला संघाची शुक्रवारी गतविजेत्या जपानशी गाठ पडणार आहे.