अहमदाबाद- कोल्हापूरचा खेळाडू अभिषेक निपाणे याने ८५ किलो गटात ब्रॉंझपदक मिळवित वेटलिफ्टिंगमध्ये महाराष्ट्राचे खाते उघडले. त्याने स्नॅचमध्ये १३४ किलो तर क्लीन व जर्कमध्ये १७७ असे एकूण ३११ किलो वजन उचलले. अभिषेक सध्या आर्मी स्पोर्ट्स इन्स्टिट्यूट येथे सराव करीत आहे.
ब्रॉंझपदकाबद्दल तो म्हणाला,” या स्पर्धेत पदक मिळवण्याचा मला आत्मविश्वास होता. स्नॅचमधील दुसऱ्या प्रयत्नात माझे फाऊल झाले अन्यथा मला सुवर्णपदक मिळवण्याची संधी होती. अर्थात ब्रॉंझपदकही माझ्यासाठी प्रेरणादायक आहे.”
अभिषेकच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र ऑलिंपिक संघटनेचे महासचिव नामदेव शिरगावकर यांनी सांगितले,” अभिषेक हा अतिशय गुणी खेळाडू आहे. त्याच्या पदकामुळे वेटलिफ्टिंग मध्ये महाराष्ट्राचे खाते उघडले गेले आहे. त्याची ही कामगिरी अतिशय अभिमानास्पद आहे.”