शाहरुखने ट्विटमध्ये लिहिलं की, ‘मन दुखावलं आहे पण अभिमानाने मान उंचावण्यासाठी अनेक कारणं आहेत. भारतीय महिला हॉकी संघाने चांगली कामगिरी केली. तुम्ही भारतातील प्रत्येक व्यक्तीला प्रेरणा दिली. हाच एक विजय आहे’, असं आशयाचे ट्विट शाहरुखने लिहिलं.
पहिल्या क्वार्टरमध्ये ग्रेट ब्रिटनने आपला धमाका दाखवला आणि भारतीय महिला संघाला 2-0 असे पिछाडीवर टाकले. पण दुसऱ्या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने आपल्यातील ताकद दाखवून दिली. या क्वार्टरमध्ये भारतीय महिला संघाने तीन गोल डागले. अखेरच्या क्वार्टरमधील गोलच्या जोरावर ग्रेट ब्रिटनने 4-3 असा विजय मिळविला.
दरम्यान, पराभवानंतर भारतीय महिला संघातील खेळाडूंना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. ग्रेट ब्रिटनच्या आक्रमण लिलया पेलणाऱ्या सविता पुनियाला मैदानातच रडू कोसळले. तिच्याशिवाय इतर महिला खेळाडूंनाही पराभवानंतर अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले. प्रतिस्पर्धी संघातील खेळाडू भारतीय महिला खेळाडूंचे सांत्वन करतानाचे चित्रही दिसले.