युवराज सिंग पुन्हा क्रिकेटचं मैदान गाजवणार!
व्हिडिओ शेअर करत म्हणे, ‘दुसऱ्या इनिंगची वेळ आलीय’

भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू क्रिकेटपटू युवराज सिंग याने त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत बरेचसे किर्तीमान आपल्या नावावर केले आहेत. त्याला क्रिकेटविश्वातील विस्फोटक फलंदाजांमध्ये गणले जाते. हाच युवराज क्रिकेटप्रेमींमध्ये सिक्सर किंग म्हणूनही प्रसिद्ध आहे. २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर फार क्वचितच चाहत्यांना त्याची फटकेबाजी पाहायला मिळाली आहे. काही दिवसांपूर्वीच त्याने मैदानावर परतणार असल्याचे संकेत दिले होते. यानंतर आता पुन्हा एकदा युवराज त्याच्या चाहत्यांसाठी मोठे सरप्राइज घेऊन आला आहे.
युवराजने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर करत कारकिर्दीतील दुसऱ्या डावाची सुरुवात करण्याची वेळ आले असल्याचे म्हटले आहे. त्याने दिलेल्या संकेतावरून तो पुन्हा एकदा क्रिकेटचं मैदान गाजवण्यासाठी सज्ज होताना दिसतो आहे.
त्याने मंगळवार रोजी (०७ डिसेंबर) ट्वीटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये कोणीतरी व्यक्ती हातात चेंडू घेऊन युवराजकडे जाताना दिसतो आहे. तर दरम्यान युवराजही हातात बॅट घेऊन फलंदाजीची तयारी करताना दिसतो आहे. हा व्हिडिओ पोस्ट करत त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘ही वर्षातील ती वेळ आहे. तुम्ही तयार आहात ना? यासाठी तुमचीही तितकी तयारी आहे ना? तुम्हा सर्वांसाठी मी एक मोठे सरप्राइज घेऊन येतो आहे! त्याबद्दल जाणून घेण्यासाठी माझ्या संपर्कात राहा.’
या व्हिडिओमधील अजून एक लक्षवेधी बाब अशी की, या व्हिडिओच्या बॅकग्राउंडमध्ये भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांचा आवाज येतो आहे. हा आवाज त्यांच्या २००७ टी२० विश्वचषकातील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यादरम्यान समालोचन करतानाच्या वेळीचा आहे. या सामन्यात युवराजने इंग्लंडच्या स्टुअर्ट ब्रॉडच्या षटकात सलग ६ षटकार ठोकले होते.
It's that time of the year. Are you ready? Do you have what it takes? Have a big surprise for all you guys! Stay tuned! pic.twitter.com/xR0Zch1HtU
— Yuvraj Singh (@YUVSTRONG12) December 7, 2021
माजी भारतीय क्रिकेटपटू युवराजने यापूर्वीही एक व्हिडिओ पोस्ट करत आपण फेब्रुवारी महिन्यात क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन करणार असल्याचे सांगितले होते. परंतु युवराजने त्याच्या क्रिकेटमधील पुनरागमनाची घोषणा केली असली तरीही तो कोणत्या क्रिकेट स्पर्धेत खेळताना दिसेल हे त्याने सांगितले नव्हते. त्यामुळे तो इतर माजी भारतीय क्रिकेटपटूंप्रमाणे रोड सेफ्टी वर्ल्ड सिरीज खेळताना दिसू शकतो. किंवा ग्लोबल कॅनडा टी२० लीगमध्ये खेळू शकतो.
Comments are closed.