मुंबई – यश धूल (११० चेंडूंत ११० धावा) आणि शेख रशीद (१०८ चेंडूंत ९४) या कर्णधार-उपकर्णधाराच्या जोडीने केलेल्या दमदार कामगिरीच्या जोरावर भारतीय संघाने सलग चौथ्यांदा युवा (१९ वर्षांखालील) विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली. भारताने उपांत्य फेरीच्या लढतीत तुल्यबळ ऑस्ट्रेलियाला ९६ धावांनी धूळ चारली. आता शनिवारी अंतिम फेरीत भारतीय युवा संघापुढे इंग्लंडचे आव्हान असेल.
चार वेळा विजेत्या भारतीय संघाने उपांत्य फेरीत नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारली. मुंबईकर अंक्रिश रघुवंशी (६) आणि हर्नूरे सिंग (१६) हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतल्याने भारताची २ बाद ३७ अशी स्थिती झाली. मात्र, धूल आणि रशीद यांनी भारताला सावरले. या दोघांनी सुरुवातीला खेळपट्टीवर स्थिरावण्यावर भर दिला आणि त्यानंतर आक्रमक शैलीत खेळ केला. या दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी २०४ धावांची भागीदारी रचली. धूल ११० धावांवर तो धावचीत झाला, तर पुढच्याच चेंडूवर रशीद ९४ धावांवर माघारी परतला. मग दिनेश बाना (नाबाद २०) आणि निशांत सिंधू (नाबाद १२) यांनी फटकेबाजी केल्याने भारताने ५० षटकांत ५ बाद २९० अशी धावसंख्या उभारली.
प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर टीग वेली (१) दुसऱ्याच षटकात बाद झाला. कॅम्पबल कॅलवे (३०) आणि कोरी मिलर (३८) यांनी दुसऱ्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी रचली. मात्र, विकी ओस्तवाल (३/४२), सिंधू (२/२५) आणि रघुवंशी (१/११) यांच्या फिरकीपुढे ऑस्ट्रेलियाच्या मधल्या फळीचा निभाव लागला नाही. लॉकलन शॉने (५१) एकाकी झुंज दिली. ऑस्ट्रेलियाचा डाव ४१.५ षटकांत १९४ धावांवर संपुष्टात आला. अखेर ऑस्ट्रेलियाचा डाव ४१.५ षटकांत १९४ धावांवर संपुष्टात आला.
धूलला कोहलीच्या पंगतीत स्थान-
ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारतीय संघ अडचणीत असताना दिल्लीकर कर्णधार धूलने ११० धावांची खेळी केली. युवा विश्वचषकात शतक झळकावणारा तो विराट कोहली (२००८) आणि उन्मुक्त चंद (२०१२) यांच्यानंतरचा तिसरा भारतीय कर्णधार ठरला. ‘‘माझ्यासाठी हे अभिमानास्पद यश आहे,’’ असे सामन्यानंतर धूल म्हणाला.
संक्षिप्त धावफलक-
भारत : ५० षटकांत ५ बाद २९० (यश धूल ११०, शेख रशीद ९४; जॅक निसबेट २/४१) विजयी वि. ऑस्ट्रेलिया: ४१.५ षटकांत सर्वबाद १९४ (लॉकलन शॉ ५१; विकी ओस्तवाल ३/४२, निशांत सिंधू २/२५, रवी कुमार २/३७