मुंबई – रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेची कार्यक्रमपत्रिका आणि आराखडा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) गुरुवारी जाहीर केला असून, अहमदाबाद येथे बलाढ्य मुंबई, गतविजेते सौराष्ट्र, ओदिशा आणि गोवा यांचा समावेश असलेल्या ड-गटाचे सामने होतील. महाराष्ट्र, विदर्भ, उत्तर प्रदेश आणि आसाम या संघांचा ग-गटात समावेश करण्यात आला आहे.
रणजी स्पर्धेच्या गटसाखळीचा पहिला टप्पा १० फेब्रुवारी ते १५ मार्च या कालावधीत होणार आहे, तर इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) हंगामानंतर बाद फेरीचा दुसरा टप्पा ३० मे ते २६ जून या दरम्यान होईल, अशी माहिती ‘बीसीसीआय’चे सचिव जय शाह यांनी गुरुवारी संलग्न राज्य संघटनांना पत्राद्वारे दिली.
यंदाच्या प्रथम श्रेणी हंगामातील सामन्यांच्या संख्येत कपात करण्यात आली आहे. प्रत्येक गटात चार संघ असल्याने गटसाखळीत प्रत्येक संघाला तीन सामने खेळायला मिळणार आहेत. एलिट गटातील सामने राजकोट, कटक, चेन्नई, अहमदाबाद, तिरुवनंतपूरम, दिल्ली, हरयाणा आणि गुवाहाटी येथे होणार आहेत, तर प्लेट गटातील सामने कोलकाता येथे खेळवण्यात येणार आहेत. मागील हंगामात करोना साथीमुळे प्रथमच रणजी स्पर्धा रद्द करावी लागली होती. यंदाच्या हंगामात १३ जानेवारीपासून रणजी स्पर्धेच्या प्रारंभाची घोषणा करण्यात आली होती. परंतु करोनाच्या तिसऱ्या लाटेमुळे स्पर्धा पुढे ढकलण्यात आली.
सामनेकपातीचा खेळाडूंना फटका
रणजी स्पर्धेच्या नव्या मानधनरचनेनुसार ४०हून अधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंना प्रति दिनी ३५ हजारांवरून ६० हजार रुपये, तर २१ ते ४० सामने खेळलेल्यांसाठी ५० हजार रुपये प्रति दिन मानधन जाहीर झाले होते. मात्र रणजीच्या या रूपरेषेनुसार २९ संघ साखळीतच गारद होणार असल्याने फक्त तीन सामन्यांचे मानधन या संघांच्या पदरी पडणार आहे.
स्पर्धेचा आराखडा –
* आठ एलिट गटांमध्ये प्रत्येकी चार संघांची विभागणी करण्यात येईल. याशिवाय उर्वरित सहा संघांचा प्लेट विभागात समावेश असेल.
* सात एलिट गटांतून प्रत्येकी एक संघ गुणानुक्रमे उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरतील. आठवा एलिट संघ आणि प्लेट गटातील एक संघ यांच्यात उपउपांत्यपूर्व सामना होईल आणि विजयी संघ बाद फेरी गाठेल.
* यंदाच्या स्पर्धेत ६२ दिवसांत ६४ सामने खेळवण्यात येणार आहेत.
* साखळी फेरीत ५७ सामन्यांचा समावेश आहे.